मोर्शी : तालुक्यातील तळणी-पिंपळखुटा मोठा मार्गावरील स्टोन क्रशरसाठी होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे तळणीतील घरांना मोठे हादरे बसत असून, नागरिकांमध्ये जीविताचे भय पसरले आहे. याबाबत तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे गावातील नागरिकांनी तक्रार केली आहे.
मोर्शी-तिवसा मार्गावरील तळणी गावापासून साधारण एक किमी अंतरावर असलेल्या एका स्टोन क्रशरमध्ये गिट्टी खोदकाम करण्यासाठी ब्लास्टिंग केले जातात. या ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना मोठे हादरे बसत आहे. भितींना तडे जात असल्याच्या तक्रारीही गावकरी करतात. ब्लास्टिंग करताच जमिनीत मोठा कंप होऊन घरातील भांडी पडणे, टिपपत्रे हलणे असे प्रकार घडतात. गावातील बहुतांश घरांच्या भिंती मातीच्या आहेत. नागरिकांचे आर्थिक नुकसान होणे सुरू झाले आहे. जीवितहानीचीही भीती नागरिकांना वाटते. जड वाहतुकीने तळणी-तिवसा मार्गाची चाळण झाली असून, गावातून ही वाहने जाताना धूळ घरात शिरते. रस्त्याच्या क्षमतेपेद्वा जड वाहने धावत असतात. संबंधित स्टोन क्रशरला दिलेल्या परवानगीची व परवान्यानुसार खोलीची पाहणी व चौकशी करण्यात यावी, असे या निवेदनात गावकऱ्यांनी नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे, नकुल निकम, विशाल पापडकर, अंकुश तिडके, प्रफुल्ल निकम, शुभम तिडके, स्वप्निल पापडकर, संदीप बोहरपी, दिनेश निकम, रोहन तिडके, सचिन साबू आदी उपस्थित होते.
--------------
विहिरींची पातळी घटली, खदानीची वाढली
सततच्या क्षमतेपेक्षा अधिक ब्लास्टिंगमुळे परिसरातील भूजलपातळीत घट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भोवतालच्या विहिरीची पातळी कमी व खदानमधील अधिक असे चित्र या परिसरात आहे. आ. देवेंद्र भुयार व जिल्हा खनिकर्म विभागालाही या ब्लास्टिंगबाबत कळविण्यात आले.