बच्चू कडू म्हणतात, हे तर षड्यंत्रच : टप्प्या टप्प्याने आंदोलन तीव्र, आधी दिला ठिय्या नंतर त्यागले अन्न, आणखी दोन दिवस संघर्ष अमरावती : शेतमालाला भाव मागण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुरुष, महिलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर नांगर आंदोलनाचे रुपांतर ठिय्या आंदोलनात आणि उशिरा रात्री अन्नत्याग आंदोलनात करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता दिलेला ठिय्या वृत्त लिहिस्तोवर कायम होता. महिला-मुले अशा अबलांवर केलेला लाठीमार अत्यंत क्लेषदायक आहे. दोषींवर कारवाई व्हायलाच हवी, या मागणीच्या पूर्ततेसाठी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवून ते अन्नत्याग आंदोलनात रुपांतरित केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत मोठा जनसमुदाय होता. कडाक्याच्या थंडीत उपाशीपोटी आमदार बच्चू कडू आणि सहभागी सर्व आंदोलक रात्र काढत होते. लाठीमार करायचाच होता तर पुरुषांवर करायला हवा होता. आम्ही छातीवर लाठ्या झेलायला तयार होतो. किमान एक सूचना तरी पोलिसांनी द्यायला हवी होती. लहान मुले, वृद्ध महिलांवर पोलीस बळाचा वापर करुच कसे शकतात, असा सवाल बच्चू कडू यांचा आहे. लाठीमार का करण्यात आला, आदेश दिले कुणी, आमचे काय चुकले, या प्रश्नांची उत्तरे बच्चू कडू यांना हवी आहेत. स्थितीचे गांभीर्य बघून जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यपडताळणी अहवाल तातडीने मागितला. तथापि रात्री उशिरापर्यंत तो सादर व्हायचा होता. उशीर लागू द्या, आणखी दोन दिवस आम्ही अन्नपाण्याविना येथेच बसले राहू, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. मीणा, पुंडकरांवर आरोप अमरावती : नांगर आंदोलनात अग्रस्थानी महिला असताना सुद्धा बळाचा वापर करण्यात पोलीस उपायुक्त शशिकुमार मीना, गाडगेनगरचे ठाणेदार पुंडकर यांनी पुढाकार घेतल्याचा आरोप आ.बच्चू कडुंनी केला. लाठीहल्ला करण्याचे आदेश कुणी दिलेत, असा सवाल आ. क डुंनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. प्रहारचे कार्यकर्ते दोषी असतील तर कारवाई करा. मात्र, निरपराध महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीहल्ला करणारे पोलीस उपायुक्त शशिकुमार मीना, गाडगेनगरचे ठाणेदार पुंडकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. ११ ला मोदींच्या जन्मगावी ‘आसूड’ आंदोलन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले नांगर आंदोलन चिरडून काढण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठीहल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मगावी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजे ११ एप्रिल रोजी आसूड आंदोलन क रणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मायक्रो फायनान्स कार्यालयांना आठ दिवसांत कुलूप ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांच्या जाचामुळे आतापर्यंत चार महिलांनी अआत्महत्या करून मृत्युला कवटाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात मायक्रो फायनान्सचे कार्यालय सुरु असल्यास त्याचे छायाचित्र दाखवा. आठवडाभरात या कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे. विनोद शिरभाते, ईब्राहिम चौधरी यांची शिष्टाई प्रहारच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आ.बच्चू कडुंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात येऊन शेतकऱ्यांच्या मागण्या-समस्या मांडाव्यात, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी हे मोर्चेकऱ्यांना सामोरे गेलेत. आ.कडुंची भेट घेऊन त्यांनी चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात यावे, असे सांगितले. त्यानुसार आ. कडुंसह प्रहारचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चेसाठी गेलेत, हे विशेष. बच्चू कडूंवर दाखल होणार गुन्हे जिल्ह्यात बुधवारी रात्री १२ वाजतापासून पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मोर्चात आणता येत नाही किंवा मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य करता येत नाही. त्यामुळे आ. बच्चू कडू व सहकाऱ्यांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. तुरीवरचा दवाळ शासनाला दिसत नाही काय? तुरीवर दवाळ आल्याने जिल्ह्यातील तुरीचे पीक जागीच जळत आहे, हे शासनाला दिसत नाही काय? असा सवाल आ. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. तीन तालुक्यांत दवाचा प्रादुर्भाव अधिक आहे. कृषीविभागाद्वारे यापिकांची पाहणी करून तसा अहवाल शासनाला पाठविल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
अबलांवर लाठ्या, बच्चू कडूंचे अन्नत्याग
By admin | Updated: January 6, 2017 00:15 IST