संकेतस्थळावर अर्ज : प्रथम येणाऱ्या अर्जाला प्राधान्यअमरावती : शेतकऱ्यांकडे त्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची योजना शासनाने सुरू केली. याअंतर्गत राज्यात ५१ हजार व विभागात १३ हजार शेततळे उभारणीचे लक्ष्य आहे. योजनेच्या आॅनलाईन अर्ज नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली. प्रथम येणाऱ्या अर्जाला प्राधान्य दिले जाईल. हे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारणाच्या माध्यमातून उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून शासनाद्वारे यापूर्वीच शेततळे योजना राबविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांकडे स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण होण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्तिक लाभाची योजना शासनाने सुरू केली. यासाठी शेतकऱ्यांकडे स्वत:ची कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे. यात कमाल मर्यादा नाही. शेतकऱ्यांची जमीन शेततळ्यांकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे गरजेचे आहे. शिवाय दारिद्र्यरेषेखालील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना निवड प्रक्रियेत ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येणार आहे. ५० हजारांचे अनुदानया योजनेत प्रत्येक शेततळ्याला ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ३० मीटर लांब व ३० मीटर रुंद व ३ मीटर खोल या आकारमानाचे छोटे शेततळे खोदण्यासाठी हे अनुदान मिळणार आहे. पाच वर्षांत किमान एकदा तरी ५० पैशाच्या खाली आणेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना प्राधान्याने हे शेततळे मिळणार आहेत. यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठित करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय समितीचे पालकमंत्री प्रमुख आहेत.
शेततळे योजनेच्या आॅनलाईन अर्जाला सुरुवात
By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST