संजय जेवडे लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. खाजगी वाहनाने प्रवास करताना प्रवाशांना ज्यादा भाड्याचा भुर्दंड पडत आहे. अतिमहत्त्वाच्या कामास जायचे असले, तर काही किलोमीटरच्या प्रवासासाठी संपूर्ण दिवस लागतो, असेही कित्येक प्रवाशांनी सांगितले. लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठेसाठी होणारा प्रवास व कार्यालयीन कामकाजासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्याने धानोरा गुरव, माहुली चोर, पिंपळगाव निपाणी, नांदसावंगी, खंडाळा, येणस, सुलतानपूर, वाघोडा, मंगरूळ चव्हाळा तसेच परिसरातील गावातील शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. कधी एकदाची एसटी सुरू होते, ही आस नागरिकांना लागली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ही ग्रामीण भागाची जीवनदायी ठरली असून ती ठप्प झाल्याने बरेच दिवसापासून प्रवाशांचे हाल सुरू आहे.
नांदगाव तालुक्यातील एसटी फेऱ्या नांदगाव खंडेश्वर बस स्थानकाहून अमरावती ते हैदराबाद, अमरावती ते पुसद, अमरावती ते पांढरकवडा, अमरावती ते माहूर, अमरावती ते चंद्रपूर, वरूड ते यवतमाळ, यवतमाळ ते तेल्हारा, दर्यापूर ते यवतमाळ, अमरावती ते बोरी, अमरावती ते मंगरूळ चव्हाळा, अमरावती ते खरबी, चांदूर ते नांदगाव खंडेश्वर अशा एसटीच्या फेऱ्या होत्या. धानोरा गुरववरून अमरावती ते दारव्हा, अमरावती ते वाढोणा रामनाथ या फेऱ्या होत्या. त्यामुळे नागरिकांची प्रवासाची सोय होत होती. पण, आता एसटी फेर्या बंद असल्याने प्रवाशांना अनेक तास बस स्टॉपवर खासगी वाहनाच्या शोधात ताटकळत थांबावे लागते.
एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. शासनाने तोडगा काढून पूर्ववत सुरू करावी.- ओंकार ठाकरे, माजी सभापती, पंचायत समिती
एसटी सेवा ठप्प झाल्याने नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. नागरिकांना खासगी वाहनाचा खर्च झेपत नाही. - नारायणदास वैष्णव, विश्वस्त, श्री खंडेश्वर संस्थान