दरीत कोसळताना बचावली : परतवाडा-धारणी मार्गावरील घटना नरेंद्र जावरे चिखलदराधारणीहून परतवाडा येथे येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या एसटी बसला घटांग ते बिहालीनजीक अपघात झाला. रस्त्याच्या कडेवरील माती पावसामुळे खचल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवारी दुपारी २.३० वाजतादरम्यान घडली. विस्तृत माहितीनुसार, परतवाडा आगाराची एसटी बस क्र. एम.एच.४०-एन.८१४४ धारणीहून परतवाड्याकडे येत असताना हा अपघात झाला. मेळघाटात तीन दिवसांपासून संसतधार पाऊस सुरू आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. रस्त्यावरूनसुध्दा पावसाचे पाणी वाहत असल्याने नालाकाठावरील जमिनीची माती नरम झाली आहे. धारणीहून परतवाड्याकडे येणाऱ्या बसचे चालक सगणे यांनी वळणावरून बस वळविताच ती रस्त्याच्या कडेला ओढली गेली व एका झाडावर आदळली. ही बस झाडाला अडकल्यामुळे दरीत कोसळण्यापासून बचावली. यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे मेळघाटात जाणाऱ्या वळणमार्गावर यापूर्वीदेखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत.प्रवाशांची उडाली भंबेरीघाट वळणातून गोलगोल फिरत प्रवाशांचा जीव अर्धमेला होत असताना एसटी थेट दरीत कोसळते की काय, या भीतीने या एसटीतील प्रवाशांनी हलकल्लोळ केला. प्रवाशांची गाडीतून बाहेर पडण्यासाठी तारांबळ उडाली होती. या अपघातात प्रवाशांना कोणतीच इजा झाली नाही. यासंदर्भात परतवाडा आगाराशी संपर्क साधला असता सर्व सुरळीत असल्याचे सांगण्यात आले.
मेळघाटात एसटी बसचा अपघात टळला
By admin | Updated: August 7, 2015 00:27 IST