अमरावती : महापालिका क्षेत्रात गृहविलगीकरणातील रुग्णांनी उल्लंघन केल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींवर २५ हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. याच धर्तीवर आता ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी प्रत्यके तालुक्यात विशेष पथक नेमण्यात येणार आहे. कोरोना संक्रमित व गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. रुग्णांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास, दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.
शहरासह काही ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात आवश्यक सूचना संबंधित यंत्रणेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या. ग्रामीण भागातही गृहविलगीकरणात अनेक रुग्ण आहेत. अशा रुग्णांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, शिवाय अनेक गावांमध्ये असे रुग्ण विनामास्क फिरत असल्याचे आढळून येत आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांवर पुन्हा दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन सर्वांनी करणे अपेक्षित आहे. कुणी या त्रिसूत्रीचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्यास, अशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
कोट
कोरोना संक्रमित व गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे. सोबतच त्रिसूत्रीचे पालन करणेही आवश्यक आहे. यासंदर्भात सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी