लोकवर्गणीतून दिली दुचाकी : रक्ततुला, लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठअचलपूर : नि:स्वार्थ समाजसेवेचा त्यांचा वसा. प्रसिध्दीची कुठलीही लालसा न बाळगता समाजसेवेचे अखंड व्रत जोपासणाऱ्या येथील विनय चतूर यांच्या उल्लेखनीय कार्याची अखेर जनतेनेच दखल घेतली. लोकांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने त्यांचा जंगी नागरी सत्कार आणि रक्ततुला मंगळवारी पार पडली. हा संपूर्ण कार्यक्रम लोकवर्गणीतून पार पडला. विशेष म्हणजे पायी फिरून लोकांच्या समस्या सोेडविण्यासाठी धडपडणाऱ्या चतूर यांना लोकांनीच पैसे गोळा करून एक दुचाकी सुध्दा भेट देण्यात आली. अचलपूर येथील शिवसेना शहर प्रमुख असलेले विनय चतूर हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचा वसा सांभाळत आहेत. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक, किडकिडीत शरीरयष्टी, मोडके घर. परंतु गरजूने हाक दिली की ते ओ देतातच. तुटक्या सायकलला पाडल मारित ते गरजवंतांपर्यंत पोहोचतात. रूग्ण सेवेचे व्रत तर त्यांनी घेतलेलेच.त्यांच्या या अखंड व्रताची नागरिकांनीच दखल घेतली आणि मारोती संस्थान, हनुमान व्यायाम मंडळ, बैरागी पेंड, जगदंब विद्यालय व त्यांच्या मित्र मंडळीच्यावतीने जगदंब हायस्कूलमध्ये नागरी सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी खा. आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. बच्चू कडू यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु हे तिनही नेते कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने रोष व्याप्त होता. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. त्यामध्ये ४५२ महिला-पुरूषांनी रक्तदान केले. आमंत्रित अध्यक्ष व अतिथीगण उपस्थित न राहिल्याने हा कार्यक्रम कृष्णकांत स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, वैद्यकीय अधीक्षक मो. जाकीर मधुकर राऊत, आदी उपस्थित होते. व्यासपिठावर माजी प्राचार्य श्याम देशपांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून शल्यचिकित्सक मोहन केवाळे यांनी जबाबदारी सांभाळली. संचालन सुधीर तारे, प्रास्ताविक दीपक अंबाडकर तर आभार प्रदर्शन प्रमोद नैकिले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
नि:स्वार्थ जनसेवेचा उत्स्फूर्त गौरव !
By admin | Updated: February 4, 2016 00:17 IST