करजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येच्या करजगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समिती सभापतींनी आकस्मिक भेट दिली. यावेळी दोन वैद्यकीय अधिकारी हजर नव्हत्या, तर एक जण हजर होत्या. हजर वैद्यकीय अधिकाऱ्याचा गावातच दवाखाना असल्याने त्या वेळी-अवेळी येत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी सभापतींपुढे मांडल्या.
सभापती वनमाला गणेशकर यांच्या भेटीदरम्यान १४ पैकी ५ कर्मचारीदेखील अनुपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पिता लहाने यांच्यासह रवींद्र चौधरी, अतुल ढोरे, शेख अजीज, वंदना कडू, रामानंद देशमुख, पंडित भुस्कडे हे उपस्थित होते. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असते. त्यामुळे अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उचित कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
-------------
प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते. त्यांच्या एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल तसेच पुन्हा गैरहजर राहिल्यास गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल.
- वनमाला गणेशकर, सभापती, पंचायत समिती, चांदूर बाजार