धामणगाव(रेल्वे) : तालुक्यात गेल्या तीन दिवसांत पडलेल्या पावसाने दीड हजार हेक्टरमधील शेतीत पाणी साचले, तर चार हजार हेक्टरातील सोयाबीन पूर्णत: दडपडले आहे. पूर्वी कमी पावसाने तर आता झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार संकट ओढवले आहे़तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५५ हजार ५४० हेक्टर असून आतापर्यंत सोयाबीन १७ हजार ४७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे़ कापूस १८ हजार ३६५ टक्के पेरणी आटोपली आहे़ तर तुरीची पेरणी ४ हजार ४६२ हेक्टरमध्ये झाली आहे़ धामणगाव तालुक्यात गत तीन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे़ दीडशे घरांत पावसाचे पाणी शिरले तर नदी काठावरील असलेल्या शेत जमिनीतील पिके मातीसह खरडून गेली. तालुका प्रशासनाने अहवाल तयार करण्याला सुरूवात केली असली तरी शासनाच्यावतीने कोणत्याही नदी काठावर आपादग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचा मोबदला मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़अधिक पावसामुळे वर्धा, चंद्रभागा मोती कोळसा, खोलाड, विदर्भ या नद्यांना आलेला महापूर तसेच बगाजी सागर धरणातील सोडलेल्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टरमध्ये पाणी साचले. गुरुवारपर्यंत शेतात पाण्याचे डबके साचले आहेत़ चिंचपूर, शिदोडी या पुर्नवसित गावांची स्थिती अधिक बिकट आहे़ मागील दहा वर्षांत कमी उत्पन्न व दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली होती़ यंदा कधी कमी व कधी अधिक पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारा आहे़ शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
धामणगावात ४ हजार हेक्टरमधील सोयाबीन दडपले
By admin | Updated: July 24, 2014 23:39 IST