आदेश नाकारले : कारवाईची तलवारअमरावती : स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमिवर प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने करण्यात आलेली बदली टाळण्यासाठी स्वास्थ अधी़क्षकाने जोरकस प्रयत्न चालविले आहेत.बदली आदेशाला केराची टोपली दाखवत हा कर्मचारी अद्यापही बदली करण्यात आलेल्या ठिकाणी रुजू झालेला नाही. त्यामुळे त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बदली टाळण्यासाठी राजकीय आडोशाला जात या कर्मचाऱ्याने महापालिका यंत्रणेला आव्हान दिले आहे.अरुण तिजारे असे या बदलीप्राप्त कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाची अवमानना चालविली आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ६ जानेवारी रोजी आदेश काढून तिजारे यांच्यासह ९ कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या होत्या. या आदेशातील ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षक यांचे पदनाम किवा वेतन श्रेणी किंवा सेवाज्येष्ठतेमध्ये कोणताही बदल होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तरीही अरुण तिजारे यांनी बदली आदेश फेटाळला. मध्यवर्ती कार्यालयामध्ये कार्यरत असलेले तिजारे यांची बदली झोन क्रमांक १ मध्ये ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक म्हणून करण्यात आली होती. मात्र तिजारे आठवडा उलटूनही बदली टाळण्यासाठी प्रयत्नरत आहेत. कारणे दाखवा नोटीस मिळूनही ते रुजू होण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांना मलईदार पदाचा मोह सुटत नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक धनंजय शिंदे यांना प्रभारी स्वास्थ्य अधी़क्षक म्हणून पदभार सोपवावा, असे तिजारे यांना आदेशित करण्यात आले. मात्र सोमनाथ शेटे यांच्या त्या आदेशाला तिजारे यांच्या लेखी कुठलेही महत्त्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान तिजारे यांनी पदभार न सोडल्याने शिंदे हे रुजू होण्यास टाळाटाळ करीत आहे. ६ जानेवारीच्या बदली आदेशाला खो देत तिजारे बदली टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. अद्यापपर्यंत त्यांना यश आलेले नाही.प्रशासकीय कामकाजात आम्ही नाक खुपसणार नाही, असे त्यांना काहींनी बजावले आहे.
स्वास्थ अधीक्षकांकडून मलईदार पद सुटेना !
By admin | Updated: January 14, 2017 00:12 IST