‘महसूल’चे दुर्लक्ष : रॉयल्टी बुडविण्याचा गोरखधंदाअमरावती : नदीपात्रातून वाळू उपसा, वाहतूक व साठवणुकीला लगाम असताना शहरात जागोजागी वाळू साठवणूक जोरात सुरु आहे. तसेच कन्हान वाळूच्या अवैध वाहतुकीने हैदोस घातला असून याकडे महसूल, प्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष चालविले आहे.जिल्ह्यात वर्धा, बेंबळा, वाठोडा शुक्लेश्वर, पेढी, पूर्णा याप्रमुख नद्यांमधून वाळू आणली जाते. महसूल विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबवून नदीतून वाळू उपसा व वाहतूक करता येते. मात्र, वर्धा नदीपात्रातून वाळू उपसा करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविली गेली नसताना धामणगाव, तिवसामार्गे शहरात वर्धा वाळू येते कशी, हा संशोधनाचा विषय आहे. इतकेच नव्हे तर वर्धा नदीपात्रातून नियमबाह्यरित्या आणल्या गेलेल्या हजारो ब्रास वाळुची साठवणूक करण्यात येत आहे. खरे तर वाळू आणली जात असताना रॉयल्टी भरूनच ती आणली जावी, असा नियम आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून महसूल अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचे हेरून वाळू व्यीवसायिकांनी रात्रीच्यावेळी वाळुची जोरदार वाहतूक चालविल्याची विश्वसनीय माहिती आहे. बांधकामासाठी वर्धा नदीपात्रातील दोन ब्रास वाळुसाठी १० ते १२ हजार रुपये मोजावे लागतात. कोणतीही रॉयल्टी न भरता वाळुची तस्करी होत असल्याचे चित्र आहे. परिणामी मागील दोन महिने वाळू व्यावसायिकांसाठी ‘अच्छे दिन’ ठरले आहेत. कन्हान वाळू वाहतुकीचा मुद्दा अधिक गंभीर आहे. वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त कन्हान वाळू आणली जात आहे. कन्हान वाळूविक्रीपोटी दरदिवसाला शहरात लाखो रूपयांची उलाढाल होते. तथापि कन्हान वाळू वाहतूक-विक्रीतून महसूल विभागाला कोणतेही उत्पन्न मिळत नाही, अशी माहिती आहे. वाळू साठवणूक करणे, नियमबाह्य असताना अमरावती व बडनेरा शहरात ठिकठिकाणी साठवून ठेवण्यात आलेली वाळू केव्हा जप्त करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.वाळू साठवून ठेवता येत नाही. परंतु वाळूसाठ्याची माहिती घेऊन तसे काही आढळल्यास ती वाळू ताब्यात घेतली जाईल. भरारी पथकाला तशा सूचना अगोदरच दिल्या आहेत.- सुरेश बगळेतहसीलदार, अमरावती.
वाळू साठवण जोरात
By admin | Updated: March 2, 2017 00:02 IST