वरुडातील प्रकार : झाडे लावा झाडे जगवा मोहिमेला तिलांजली वरूड : स्थानिक नगरपरिषदेच्या हद्दीतील बसस्थानक ते चुडामणी नदीपर्यंत महात्मा गांधी चौक सिमेंट रस्त्याची कामे सरू आहेत. परंतु रस्ता रुंदीकरणात निंबासह आडजातीचे वृक्ष येत असल्याने विकासकामाच्या नावावर १६ ते १७ हिरव्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ मोहिमेलाच तिलांजली देण्याचा प्रकार शहरात सुरू असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद हद्दीतील बसस्थानक ते महात्मा गांधी चौकातील डांबरी रस्त्यावर सिंमेट रस्त्याचे काम सुरू आहे. सदर रस्त्यावर निंबासह आडजातीची हिरवी डौलदार वृक्ष आहे. परंतु बीआरजीएफ आणि रस्ता निधीतून ६७ लाख रुपये किमतीच्या सिमेंट रसत्याचे बांधकाम करण्यात येत असून रस्ता रुंदीकरणात अडसर ठरत असलेली १६ ते १७ हिरव्या वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात येत आहेत. एकीकडे शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्ष लागवडीचे 'टार्गेट' प्रत्येक शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालयाला देण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रत्येक गाव, तालुक्याला लाखो वृक्षांची लागवड आणि संवर्धनाकडे लक्ष दिले जाते.विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे काम दिले जाते. दुसरीकडे महाकाय वृक्ष कापण्याचा धंदा हेच प्रशासन करीत आहे, ही शोकांतिकाच आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सावली देणाऱ्या वृक्षांची कत्तल आता पर्यावरणवादी तसेच वृक्षप्रेमींमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. केवळ विकासकामांच्या नावावर महाकाय वृक्ष कापणे आणि त्या जागेवर रोपटी लावणे हेच प्रशासनाचे काम आहे काय, अशी विचारणा पर्यावरणवादी करीत आहेत. एखाद्या शेतकऱ्याने विनापरवानगी वृक्ष कापले तर महसूल विभाग, वनविभागाद्वारे त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. आता कारवाई कोणावर करणार, हाच तर प्रश्नच आहे. (तालुका प्रतिनिधी)
विकासकामांच्या नावावर हिरव्या वृक्षांची कत्तल !
By admin | Updated: May 23, 2016 00:23 IST