दर्यापूर : स्थानिक नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नलिनी भारसाकळे यांना नगरविकास विभागाच्या अवर सचिवांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती येथील पालिका नगरसेवकांनी मंगळवारी दिली.
नगपालिकेच्या १२ सदस्यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. नगराध्यक्षांच्या आमदार पतीचा शासकीय कामात सतत हस्तक्षेप, नगरसेवकांच्या लोकोपयोगी विषयावर सर्वसाधारण बैठकीत चर्चा न करणे, अधिनियमाच्या कलम ८१ (१) मधील तरतुदीनुसार दरमाह सभा न घेणे, असे आरोप करण्यात आले होते. नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. सकृतदर्शनी त्या दोषी असल्याचे नमूद करत तसा अहवाल नगर विकास विभागाला पाठविण्यात आला. यावर नगर विकास विभाग मंत्रालयाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांच्या स्वाक्षरीनिशी २५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ (अ व ब) अन्वय नगराध्यक्षांना पदावरून दूर करावे, अशी तक्रार १२ नगरसेवकांनी दाखल केली होती. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आल्याचा संदर्भ देत आपण उर्वरित मुदतीत अध्यक्षा म्हणून पुन्हा निवडून येण्यास अपात्र असाल, तसेच उर्वरित मुदतीत पालिका सदस्य राहण्यासाठी निरर्ह का ठरवू नये, याबाबत नोटीस बजावत १५ दिवसात शासनाकडे खुलासा करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक अनिल बागडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सागर गावंडे, सभापती शाहदतखॉ अताउल्ला खॉ, नीलिमा पाखरे, किरण गावंडे, इबादुल्लाखॉ, राजकन्या चव्हाण उपस्थित होते.
कोट
अशी कुठलीही कारणे दाखवा नोटीस मला मिळालेली नाही. गटनेत्याच्या उपस्थितीशिवाय नगरसेवकांना पत्रपरिषद घेता येत नाही.
नलिनी भारसाकळे,
नगराध्यक्ष, दर्यापूर
--------