अंजनगाव सुर्जी : दीड वर्षापासून सततची कोरोनाची परिस्थिती पाहता दोन महिन्यांपूर्वी अंजनगाव शहरातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता प्रशासन स्तरावरून शहरात कडक निर्बंध लावण्यात आले होते. वाढत्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले होते, त्यामुळे कालांतराने संपूर्ण जिल्ह्यात शिथिलता करण्यात आली. थोड्या प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शासन स्तरावरून लसींचा पुरवठा करणे गरजेचे असताना अंजनगाव शहरात केवळ एक दिवसाआड 100 ते 150 लसींचा पुरवठा होतो, तोही कधी कोविशिल्ड तर कधी कोव्हॅक्सिन आणि दरदिवशी लसीकरणासाठी लोकांची गर्दी ही 400 ते 500 त्यामुळे 100 ते 150 लसींचा पुरवठा हा केवळ मोजक्याच लोकांसाठी पुरत असल्यामुळे उर्वरित लोकांना आल्यापावली परत जावे लागते, त्यामुळे शहरवासीयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत आमदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हा शल्यचिकित्सक निकम, तालुक्का वैद्यकीय अधिकारी यांना लसींचा पुरवठा वाढविण्यात यावा यासाठी अवगत केले; परंतु लोकप्रतिनिधी व अधिकारीसुद्धा उदासीन दिसून आले. यावरून जनतेचा वाली कोण, ही परिस्थिती सद्य:स्थितीत अंजनगाव शहरात निर्माण झाली आहे, तसेच अशीच लसींची परिस्थिती राहिल्यास भविष्यात शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक होणार, हे निश्चित. वाढती गर्दी पाहता वरिष्ठ स्तरावरून लसींचा पुरवठा हा कमी येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून लसींचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा तरच नागरिकांची लसींची सोय होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. सद्य:स्थितीत शहरात वाढती लसींची मागणी पाहता व दिवसेंदिवस लोकांची वाढती संख्या पाहता मी वरिष्ठ स्तरावर लसींचा पुरवठा वाढवून देण्यासाठी बोलतो, असे आमदार बळवंत वानखडे यांनी सांगितले.
अंजनगावात लसींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST