अमरावती : राज्यातील आघाडी सरकार विविध पातळयावर अपयशी ठरले असल्याने जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या पुर्ततेसाठी शुक्रवारी इर्विन चौकातून शिवसेनेने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर महत्त्वाचे प्रश्न मांडून ते निकाली काढण्याची मागणी शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी केली. शिवसेनेच्या प्रमुख मागण्यामध्ये अतिवृष्टी व गारपीठग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, पुरामुळे वाहुन गेलेल्या घरांचे पुनर्वसन व आर्थिक मदत देण्यात यावी, महावितरण कंपनीचा गलथान कारभार व शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबवावे, मागील वर्षी झालेली पिकांची नुकसान भरपाई अद्यापपर्यंत मिळालेली नाही. ती त्वरित देण्यात यावी, ज्या गावांना पुराचा धोका संभवतो अशा ठिकाणी पूरसंरक्षक भिंतीची व्यवस्था करावी, किंवा सुरक्षित ठिकाणी नागरीकांचे पुनर्वसन करण्यात यावे, तसेच तूर व हरभऱ्याचे नाफेडव्दारा मिळणारे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ते त्वरित द्यावे, सुपरस्पेशालिटी, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच स्त्री रूग्णालयासह संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे ती सुधारावी, अशा विविध मागण्या करीत शहरातील घरकुलाचे प्रलंबित प्रश्न सोडवून गोरगरीब लाभार्थ्यांना लाभ द्यावा, विलासनगर येथील झोपडपट्टीतील रहिवाशांना घरे व वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, महापुरामुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी डीसीपीने मंजूर केलेला निधी जिल्हा परिषदेला वळता करून कामे मार्गी लावावे, अशा विविध मागण्या जिल्हाधिकारी किरण गीते यांच्याकडे करण्यात आल्या. दरम्यान यासंदर्भात स्थानिक स्तरावरील प्रश्न त्वरित निकाली काढले जातील आणि जे प्रश्न शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी खा आंनदराव अडसुळ, संजय बंड,अंनत गुढे,अभिजीत अडसुळ,प्रशांत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, बाळासाहेब भागवत, दिनेश वानखडे, सुधीर सुर्यवंशी, दिगंबर डहाके, नाना नागमोते अमोल निस्ताने बाळा तळोकार, प्रविण हरमकर,भैय्या बरवट, आशिष सहारे, प्रकाश मंचलवार, नितीन हटवार विजय होटे, राजेंद्र तायडे,प्रविण अडसपुरे,नितीन तारेकर, आशिष धर्माळे, बंडु साऊत,विकास येवले नरेद्रपडोळे, महेंद्र दिप्टे, लक्ष्मी शर्मा याच्यासह मोठया संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
शिवसेचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST