महामार्ग रोखला : एआयएसएफचा पुढाकार, आश्वासनानंतर वाहतूक सुरळीतनादंगाव खंडेश्वर/शिवणी रसुलापूर : नांदगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या शिवणी रसुलापूर येथे जलद बसथांबा मिळूनही बसेस थांबत नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकरी व एआयएसएफ कार्यकर्त्यांनी बुधवारी चक्काजाम आंदोलन करून दोन तास चक्काजाम केला. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, शिवणी येथे सात वर्षांपूर्वी जलद बसथांबा मिळण्यासाठी रात्रीच्या वेळी अकस्मात चक्काजाम आंदोलन झाले होेते. त्यावेळी प्रशासनाने बसथांबा दिला होता. त्यानंतर जवळपास सन २०१४ पर्यंत शिवणी येथे जलद बसेस थांबत होत्या. परंतु वर्षभरापासून शिवणीत बसथांबा असूनही येथे एसटी बसेस थांबत नाहीत. चालक या थांब्यावर गाड्याच थांबवीत नसल्याने विद्यार्थी व इतर प्रवासी जेरीस आले होते. वास्तविक येथून शिक्षणाकरिता अमरावती व नांदगाव येथे दररोज १०० ते १५० विद्यार्थी शिक्षणाकरिता ये-जा करतात. परिवहन विभागाला या गावातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परंतु तरीही जलद बसेसचे चालक व वाहक मनमानी करून येथे बस थांबविण्यास नकार देतात. या प्रकाराला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनाने हादरलेल्या नेर डेपोचे वाहतूक नियंत्रक राठोड व बडनेरा डेपोचे वाहतूक नियंत्रक पवार आणि जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शिवणी येथे सर्व जलद बसेस थांबतील, असे आश्वासन दिले. या आंदोलनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी उमेश बनसोड, श्याम कुनबीथोप, शिवणीचे सरपंच मधुकर कोठाळे, विजय बिसने, ज्ञानेश्वर कळंबे, विनोद वैद्य, माधव ढोके आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
बसथांब्यासाठी शिवणीवासीयांचा चक्काजाम
By admin | Updated: September 17, 2015 00:16 IST