फोटो - बगाजी सागर ०७ पी
धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात ९५ टक्के जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले. वर्धा नदीला पूर आला असून, दोन दिवस पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे. यादरम्यान दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शिदोडी गावात पाणी शिरले, तर गव्हा फरकाडे येथील भिंत पडल्याने एक बकरी ठार झाली. ११४ घरांची पडझड झाली आहे.
अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील बगाजी सागर धरणाच्या जलसाठ्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील वाढ झाली आहे. ९५.७७ टक्के जलसाठा या धरणात आहे. त्यामुळे बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे ४५ सेंमीपर्यंत उघडून १३.०७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी १० पासून सुरू झाला आहे. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे़
वर्धा नदीकाठावरील वरूड बगाजी, चीचपूर, तुळजापूर, बऱ्हाणपूर , नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, सोनोरा काकडे, आष्टा, झाडा, चिंचोली, विटाळा या गावातील गावकरी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नदीकाठावरील शेतकरी, मानवी वस्तीचे ठिकाणे, घरे, मछिमार नदीकाठावर रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे व मंगरूळ दस्तगिरचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी केले आहे.
शिदोडीत अर्ध्या गावात शिरले पाणी
शिदोडी या पुनर्वसन गावात गावातील नाल्याचे बांधकाम अर्धवट झाल्याने येथील चार हजार स्क्वेअर फूट असलेल्या घरात अर्ध्या रात्री पाणी शिरले त्यात हरिचंद्र शिवरकर, बंडू शेंडे, किसन मांढरे ज्ञानेश्वर शिवरकर, राजू कराळे, दिवाकर शेंडे रामचंद्र न्हाने यांच्या घरील धान्य कपडे तसेच जीवनाश्यक वस्तू ओल्या झाल्या आहे तालुक्यातील ११४ घरांची पडझड झाली आहे तर गव्हा फरकांडे येथील भिंत कोसळल्याने एक बकरीचा मृत्यू झाला. दोन हजार हेक्टर शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.