बछड्याला जन्म देताच गाय दगावली : न चुकता दूध पाजणे हीच वेदांतीची दिनचर्याराहुल भुतांगे तुमसरगाईने बछड्याला जन्म देताच ती दगावल्याने एकाकी पडलेल्या बछड्यावर मायेचा हात फिरवित व मानव धर्माचे पालन करीत एका सहा वर्षीय मुलीने गाईच्या वासराला नित्यनेमाने बॉटलने दूध पाजत आहे. वेदांती प्रमोद तितिरमारे रा.विनोबा भावे नगर तुमसर असे या चिमुकलीचे नाव आहे. आजच्या युगात बालकांच्या मनात कधी काय चालत असेल हे सांगणे कठीणच झाले आहे. तसाच काहीसा प्रकार तुमसरात घडला. तुमसर पालिकेत काँग्रेसचे गटनेता प्रमोद तितिरमारे हे डोंगरला येथील शेतात गोपालन करतात. काही दिवसांपूर्वी एका गाईने एका वासराला जन्म देताच ती गाय दगावली. याची माहिती तितीरमारे यांना होताच ते मुलगी वेदांतीसह डोंगरला येथील गोठ्यात गाय व वासरू बघण्यासाठी गेले. तिथे वेदांतीला बछडा एकाकी पडलेला दिसला. तिने तिच्या वडिलांना त्या वासराची मम्मी कुठे आहे, असा प्रश्न केला. त्यावेळी वेदांतीच्या वडिलाने या वासराला जन्म देताच त्याची आई दगावल्याचे सांगितले. बेटा तू लहान होती त्यावेळी याच गाईचेच दूध पित असल्याची जाणीव तिच्या वडिलाने वेदांतीला करून दिली. त्यानंतर तिने घरी जाण्याचा हट्ट धरला. दरम्यान तुमसरला येताच तिने औषधी दुकानातून बालकांना दूध पाजतात ती बॉटल विकत घेऊन मागितली व परत डोंगरला येथील शेतात जाऊन तिने बॉटलमध्ये दूध भरून त्या वासराला पाजायला सुरूवात केलीे. तिथे उपस्थित सर्वजण तिच्या या कृतीने गहिवरले. यावेळी उपस्थिताने वेदांतीला प्रश्न विचारला तेव्हा तिच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघाले की, ज्या गोमातेचे दूध पिऊन मी एवढी मोठी झाली आहे. ती गोमाता दगावल्यानंतर तिच्या वासराला दुधाविना मरू देणार नाही, उत्तराने सर्वच आश्चर्यचकित झाले. त्यादिवसापासून वेदांती ही नियमित सकाळ आणि सायंकाळ डोंगरला येथील शेतात जाऊन स्वत:च्या हाताने दूध पाजून ऋण फेडत आहे.
गाईच्या वासराला दूध पाजून ‘तिने’ ऋण फेडले
By admin | Updated: March 17, 2016 00:36 IST