अमरावती : मूळचा अमरावती येथील रहिवासी व आता पुण्यात स्थायिक झालेल्या शैलेश रायपुरे याने उत्कृष्टपणे रेखाटलेल्या गणपती रेखाचित्राच्या संग्रहाची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.शैलेशने गणपतीचे दहा हजार तीनशे रेखाचित्र रेखाटले आहेत. त्याचा संग्रहदेखील करून ठेवला आहे. त्याच्या या रेखाचित्रांच्या संग्रहाची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली असून तशी नोंद त्यांच्या बुकमध्ये घेतली आहे. सदर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी २२ जून रोजी तसे प्रमाणपत्र शैलेशला दिले व त्याचा सन्मान करण्यात आला. लहानपणापासूनच शैलेशला रेखाचित्र काढण्याची आवड निर्माण झाली आहे. त्याच आवडीतून आणि गणरायावर असलेल्या अपार श्रद्धेतून त्याने वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे दहा हजार तीनशे आकर्षक रेखाचित्र रेखाटले आहेत. विद्यमान स्थितीत शैलेश अॅनिमेशन क्षेत्रात कार्यरत आहे. मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबा, बहीण, भाऊ व गुरूजनांना दिले आहे. (प्रतिनिधी)
शैलेश रायपुरेच्या संग्रहाची इंडिया बुकमध्ये नोंद
By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST