अनिल कडू
परतवाडा : पशुवैद्यक शास्त्राचे ज्ञान प्राप्त न करता मुक्या प्राण्यांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या राज्यातील बोगस स्वयंघोषित पशुवैद्यकीय डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदने देताच हे स्वयंघोषित पशुवैद्यकीय डॉक्टर संपावर गेले आहेत.
पशुवैद्यक शास्त्राची पदवी नाही, पशुवैद्यक परिषदेकडे नोंदणी नाही तरी हे स्वयंघोषित लोक स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत आहेत. नावापुढे ते डॉक्टर ही उपाधीही लावत आहेत. भारतीय पशुचिकित्सा परिषदेनेसुद्धा या अशा स्वयंघोषित बोगस डॉक्टरांविरुद्ध पावले उचलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अनुषंगाने त्यांनी सर्व राज्यांच्या, पशुसंवर्धन विभागाच्या, सचिवांना १४ जुलैला पत्र पाठविले. केवळ बीव्हीएस्सी अँड एएच किंवा एमव्हीएस्सी अहर्ता धारक नोंदणीकृत डॉक्टरच व्हेटरनरी मेडिसिनची प्रॅक्टिस करू शकतात. शैक्षणिक अहर्ता नसलेले, अनोंदणीकृत व्यक्तींना ही प्रॅक्टिस करता येत नाही, असे भारतीय पशुचिकित्सा परिषदेने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
--------------
स्वयंघोषित बोगस डॉक्टर
राज्यात स्वयंघोषित बोगस डॉक्टरांची संख्या लाखोंच्या घरात आहे. प्रत्येक जिल्ह्यात ते हजाराच्या जवळपास आहेत. अनेक वर्षांपासून हे स्वयंघोषित डॉक्टर माल प्रॅक्टिस करीत आहेत. पशुपालकांजवळून अव्वाच्या सव्वा पैसे ते उकळत आहेत. यात काही डिप्लोमाधारक, तर काही कुठलाही डिप्लोमा नसलेले लोक राज्यभर पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून पशूंवर बोगस उपचार करीत आहेत. यातील काही तर मुक्या जनावरांवर शस्त्रक्रियासुद्धा करतात. याला ते ‘गाय फाडणे’ असे म्हणतात. हे लोक ‘घंटा’, ‘हाणणे’, अशा शब्दांचाही वापर करतात. या बोगस डॉक्टरांविरोधात राज्यातून शेकडो तक्रारी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेकडे पोहोचल्या आहेत.
--------------------
अर्हताधारक नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांनाच व्हेटरनरी मेडिसिनची प्रॅक्टिस करता येते. राज्यात बोगस स्वयंघोषित पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ. अजय पोहरकर, अध्यक्ष, राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर