महानिरीक्षकांनी केली तपासणी : कैद्यांशी साधला संवाद, समस्या जाणून घेतल्याअमरावती : राज्याच्या कारागृह विभागाच्या नोंदी अमरावती मध्यवर्ती कारागृह हे अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मुंबईचे आॅर्थर रोड, पुण्याचे येरवडा कारागृहानंतर करण्यात आली आहे. मात्र नागपूर येथे ‘जेल ब्रेक’ झाल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी मध्यवर्तीे कारागृहाचे महानिरीक्षकांनी सुरक्षा आॅडिट केले. या आॅडिटमध्ये अमरावती ‘गूड’ ठरले.अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी मध्यवर्ती कारागृहात आस्कमिक भेट देऊन सुरक्षेसंदर्भाचा आढावा घेतला. यावेळी उपाध्याय यांनी बंदीजणांसोबत संवाद साधताना त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतला. न्यायालयीन कामकाज, व्हिडीओ कॉन्फ्ररसिंगची परिस्थिती जाणून घेतली. बंदीजणांना मिळणाऱ्या हक्काच्या सुट्या, नातेवाईकांची भेट तसेच कारागृहाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीची दखल त्यांनी घेतली. सुरक्षा आॅडिट सुरु असताना अचानक कैद्यांसोबत संवाद साधण्याची त्यांनी ईच्छा दर्शविली. काही बंदीजणांसोबत हितगूज साधताना जेवन, व्यवस्था, उपक्रमाविषयीची माहिती जाणून घेतली. सुरक्षा आॅडिट दरम्यान कारागृह महानिरीक्षक उपाध्याय यांनी पुरुष, महिला बंदींना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. शिवणकाम, सुतारकाम, आरागिरणी, शैक्षणिक उपक्रम, विविध प्रकल्प, कारागृहांची स्वच्छता, ई- सेल, प्रिझम, बंदीजणांची नातेवाईकांसोबत मुलाखत, व्हिडीओ कॉन्फरंसिंगने न्यायालयीन कामकाज, कैद्यांची तारीख, अंतर्गत व बाह्य सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा मनोरे, शेतीकाम, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेताना निवासस्थानांची स्थितीदेखील त्यांनी जाणून घेतली. एकूण १६ बराकीत बंदीस्त कैद्यांच्या संख्येचा आढावा घेतला. विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजणांची माहिती जाणून घेताना सुरक्षेबाबत अतिदक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी कारागृह प्रशासनाला दिल्या. यावेळी कारागृह अधीक्षक एस.व्ही. खटाकवर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद पिल्लेवान, नितीन क्षीरसागर, भूषण कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सुरक्षेसाठी ठरले ‘गुड’ अमरावती मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेबाबत केलेल्या उपाययोजनांची कारागृह महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी अधिकाऱ्यांना ‘गुड’ ठरविले. सीसीटिव्ही कॅमेरे, नातेवाईकांची मुलाखत, पेपरलेस कार्यप्रणाली, तटावर कडेकोट सुरक्षा आदी बाबी तपासून कारागृह अधीक्षक एस. व्ही. खटावकर यांच्यासह सहकारी अधिकाऱ्यांची त्यांनी स्तुती केली.
मध्यवर्ती कारागृहाचे सुरक्षा आॅडिट
By admin | Updated: February 3, 2016 00:17 IST