जिल्हा परिषद, विस्तृत माहितीचे खातेप्रमुखाद्वारे सादरीकरण
अमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी पदभार स्वीकारताच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विस्तृत आढावा संबंधित खातेप्रमुखांकडून घेतला जात आहे. सोमवारपासून या आढाव्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. प्रत्येक विभागाची इत्थंभूत माहिती घेऊन विभागप्रमुखांकडून विविध योजना, प्रशासकीय कामकाजाची आजघडीला काय स्थिती आहे, असे एकूण एक बारकावे मुख्य कार्यकारी अधिकारी जाणून घेत आहेत. साेमवारपासून सुरू झालेल्या विभागनिहाय आढाव्यामध्ये प्रारंभी महिला व बाल कल्याण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागांचा मंगळवारी दुपारपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी संबंधित खातेप्रमुखाकडून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना, अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार, मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, झेडपीमार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना व अन्य कामकाजाचा तसेच नरेगामार्फत जिल्हाभरात सुरू असलेली कामे, कार्यरत मजूर, कामाची मागणी, सिंचन विहिरी, वृक्षारोपण व अन्य कामांचा आढावा घेत मेळघाटासह अन्य तालुक्यातील रोहयो कामांची स्थिती, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजना व प्रशासकीय कामकाज, याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सध्या मेळघाटसह अन्य तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती, टँकर, विहीर अधिग्रहण, सुरू असलेली कामे, अपूर्ण कामे याचीही माहिती घेतली आहे. यासोबतच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आदींमधून मंजूर घरकुले, प्रगतीवर असलेली, अपूर्ण व पूर्ण झालेल्या घरकुलाचा आढावा, लाभार्थी अनुदानाची स्थिती, पंडित दीनदयाल योजनेंतर्गत जागा खरेदीचे प्रस्ताव यांसह सर्वच कामांचा सीईओंनी खातेप्रमुखांकडून विस्तृत आढावा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे घेतला आहे. यावेळी त्यांनी आवश्यक सूचनाही संबंधित खातेप्रमुखांना दिल्या आहेत.
बॉक्स
सर्वच विभागांचा आढावा
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वच विभागांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. गत दोन दिवसांत जवळपास पाच विभागांचा आढावा घेण्यात आला आहे. यानंतर उर्वरित आरोग्य शिक्षण, बांधकाम, समाजकल्याण, कृषी, पशुसंर्वधन, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण आदी विभागांचा आढावा घेतला जाणार आहे.