पोहरा बंदी : पाण्याच्या शोधात भटकलेली १४ रानडुकरे मांडवा परिसरातील धनापूर येथील एका शेतातील विहिरीत पडली. या घटनेची माहिती मिळाल्यावर चांदूर रेल्वे वनकर्मचारी व रेस्क्यू पथकांनी विहिरीत पडलेल्या रानडुकरांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढून त्यांपैकी ११ रानडुकरांना जीवदान देण्यात यश मिळविले. तीन रानडुकरांचा मृत्यू झाला.
शनिवारी (दि. १) चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चांदूर रेल्वे वर्तुळातील मांडवा परिसराच्या धनापूर येथील नंदकिशोर पनपालिया यांच्या शेतात पाण्याच्या शोधात रानडुकरांचा कळप शिरला आणि त्यांपैकी १४ रानडुकरे शेतातील विहिरीत पडल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेस्क्यू पथकाच्या मदतीने रानडुकरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विहिरीत पाणी असल्याने यापैकी रेस्क्यूदरम्यान तीन रानडुकरे मृतावस्थेत विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले.
या रानडुकरांना बाहेर काढण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक वीरेंद्र पवार, वनमजूर शरद खेकाळे, बबन चव्हाण, शिकारी प्रतिबंधक वनरक्षक अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक व संरक्षण मजूर, आदींनी परिश्रम घेतले.