महापालिका निवडणूक : शहरात २२ प्रभाग अमरावती : फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारने चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. अध्यादेशातून तपशील जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका सूत्रांनी अध्यादेशाला दुजोरा दिला आहे. महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग होणार असल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने प्रभाग रचनेचे काम येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. प्रभाग रचना नेमकी कशा पद्धतीने होणार, याबाबत नगरसेवक आणि राजकीय पक्षांमध्ये कुतूहल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तीन आठवड्यापूर्वीच सूतोवाच केले होते. त्यानंतर रिपाइं आठवले गटासह अनेक छोट्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी एक प्रभाग चार सदस्य प्रणालीचा जोरदार विरोध केला. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत बड्या राजकीय पक्षांचे भले होईल मात्र अपक्षांचे अस्तित्व पणाला लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. मात्र विरोधाला न जुमानता २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारने चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयाने महापालिका आणि एकुणच राजकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे. सत्ताधीशांचा आग्रहचार सदस्यांच्या प्रभागासाठी भाजप आधीपासून सकारात्मक आहे. भाजपचे संघटनमंत्री रामदास आंबटकर यांनी यापूर्वीच तसे संकेत वेळोवेळी दिले होते. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा पक्षाला फायदा होईल, असा भाजपजनांचा होरा आहे. या पार्श्वभूमीवर चार सदस्यीय प्रभागाचा निर्णय जाहिर झाल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.अमरावती महापालिका क्षेत्रात तुर्तास ४३ प्रभाग आहेत. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत ४३ प्रभागातून ८७ नगरसेवक निवडून आले आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आल्यानंतर महापालिका क्षेत्रात २२ प्रभाग राहतील. त्यातील २१ प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा राहील. ही निवडणूक सन२०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रारूप लोकसंख्येत बदल होणार नाही. (प्रतिनिधी)अध्यादेशात काय?महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथे चार पालिका सदस्य, परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नाहीत. एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील, असे म्हटले आहे. प्रत्येक मतदाराला त्याच्या प्रभागातील निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा हक्क असेल, असे अध्यादेशात नमूद असल्याचे महापालिका सूत्रांनी म्हटले आहे.
चार सदस्यीय प्रभागावर शिक्कामोर्तब
By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST