अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदासाठी गत ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेबर पर्यत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते.या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे १८३ नामांकन अर्ज प्राप्त झाले होते.या नामांकन अर्जाची मंगळवार ७ सप्टेबर रोजी येथील सहायक निबंधक कार्यालयातील सभागृहात छानणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.यामध्ये १८३ नामांकन अर्जापैकी १७८ अर्जावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही. तर ५ जणांच्या अर्जांवर लेखी स्वरूपात आक्षेप नोंदविले आहे. ही प्रकरणे निर्णय प्रक्रियेत आहेत.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आटोपली आहे. उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये बहुतेक राजकीय पक्षांच्या दिग्गजासह संचालकांचा समावेश आहे. गत पाच दिवसात १८३ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा बँकेसाठी होत असलेल्या संचालक पदासाठी सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४, एससी-एसटी, ओबीसी आणि व्हीजेएनटी या मतदारसंघातून प्रत्येकी एक याप्रमाणे ३, महिला संवगार्तून २ आणि इतर शेती संस्था तसेच नागरी सहकारी बँका संवगार्तून प्रत्येकी एक याप्रमाणे दोन अशाप्रकारे एकूण २१ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या १८३ अर्जाची कार्यक्रमानुसार ७ सप्टेंबर रोजी अर्ज छाननी करण्यात आली आहे. पाच जणांच्या नामांकन अर्जावर आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपावर बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ८ सप्टेंबरला छाननी अंतिम अर्जाची यादी घोषित केली जाणार आहे. त्याच दिवसापासून निवडणुकीतून माघार घेणे सुरू होणार. २२ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रसिंग चव्हाण,सहायक निबंधक स्वाती गुडधे,भालचंद्र पारवे आदीसह गजानन डायरे,सतीश समर्थ,सुभाष खोरगडे,राम देशमुख, सुधीर मानकर आदी सहभागी झाले होते.
बॉक्स
कुणी कुणावर नोंदविले आक्षेप?
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी अ-सेवा मतदारसंघातून नामाकंन दाखल केले होते. त्यांचे नामांकन अर्जावर बँकेचे माजी संचालक प्रवीण काशिकर यांनी आक्षेप घेतला. सुधीर सूर्यवंशी यांनी अ-सेवा वर्ग मतदारसंघात नामांकन दाखल केले आहे. त्यांच्या नामांकन अर्जावर अरविंद पावडे यांनी अक्षेप घेतला, तर महिला प्रतिनिधी राखीव मतदारसंघात जयश्री राजेंद्र देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. या अर्जावर सुधीर देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. क- दोन या मतदारसंघातून राजेंद्र महल्ले यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या नामांकन अर्जावर प्रकाश काळबांडे यांनी, तर याच मतदार संघात नामांकन अर्ज दाखल केलेल्या प्रकाश काळबांडे यांच्या अर्जावर राजेंद्र महल्ले यांनी आक्षेप नोंदविल्याचे निवडणूक विभागाचे सूत्रांनी सांगितले. ही पाचही प्रकरणे निर्णय प्रक्रियेत आहेत.