अधिकृ त कार्यक्रम धडकला : प्रशासकीय तयारीचा जोर वाढलाअमरावती : विधिमंडळ सचिवालयाने अनुुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हा दौरा नियोजित केल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह अन्य विभागातही अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्यासाठी प्रशासनात लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून ही समिती जिल्ह्यातील कामकाजांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा समितीच्या आढाव्यात कुठल्याही उणिवा राहू नये, यासाठी कामाला लागली आहे. ऐन सुट्यांच्या दिवसांत कार्यालयाकडे न फिरकणारे कर्मचारी सुटीच्या दिवशीही एसटी कमेटीच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय कामकाज करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येत्या आठवड्यात अनुसूचित जमाती कल्याण समितीचे पदाधिकारी मंगळवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत अनुुसूचित जमातीच्या कल्याणकारी योजना व अडचणींबाबत अनौपचारिक चर्चा करून माहिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुुसूचित जमातींच्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, व अनुशेष, जातपडताळणीविषयक बाबी तसेच आदिवासी क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.याशिवाय विद्युत वितरण कंपनी, यासोबतच जिल्हा परिषद, अन्य ठिकाणी ही समिती भेट देऊन तेथेही अनुसूचित जमाती प्रवार्गातील भरती, बदली, आरक्षण व अनुशेष आदी विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर २० सप्टेंबर बुधवार रोजी जिल्ह्यातील आश्रम शाळा, वसतिगृह व यंत्रणानिहाय केलेल्या कामांची पाहणी करणार आहे. यात आदिवासी क्षेत्रात उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी क्षेत्रात उपयोजना राबविण्यात आलेल्या विविध योजनांबाबत केलेल्या कामांची झाडाझाडती घेण्यात येणार आहे. या दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून समिती समोर कुठल्याही उणिवा दिसून येऊ नये, याची खबरदारी मात्र बाळगत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)या आमदारांचा आहे समावेशविधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख म्हणून आ. रूपेश म्हात्रे हे आहेत, तर समिती सदस्यांमध्ये आमदार अशोक उईके, राजू तोडसाम, नारायण कुचे, पास्लक धानारे, प्रभुदास भिलावेकर, चंद्रकांत सोनवणे, काशिराम पावरा, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, गोपिकिशन बाजोरिया, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, चंद्रकांत रघुवंशी आदी आमदारांचा समावेश आहे. याशिवाय काही अधिकाऱ्यांचा या दौऱ्यात समावेश राहणार आहे.
अनुसूचित कल्याण समिती दौऱ्याने झेडपीत लगीनघाई
By admin | Updated: October 17, 2016 00:18 IST