फोटो मेलवर आहे
अमरावती: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशावरून मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथे २ जानेवारी या सुटीच्या दिवशी पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी सालबर्डी यात्रास्थळाचा परिसर श्रमदानातून चकाचक केला. परिसर स्वच्छतेनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकमुक्तीसह हरित शपथसुद्धा घेतली.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी काही दिवसांपूर्वी श्रीक्षेत्र सालबर्डी येथे भेट दिली होती. त्यावेळी मोर्शीचे गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार यांना स्वच्छता अभियान राबविण्याबाबत सूचना केली होती. त्यामुळे शनिवारी पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवून यात्रेचा संपूर्ण परिसर महास्वच्छता अभियान राबवून पवार यांनी कचरामुक्त केला. आता हा संपूर्ण परिसर स्वच्छ व चकाचक दिसत आहे. निसर्गाच्या सान्निध्यामुळे हा परिसर आता अधिकच देखणा दिसू लागला आहे. महास्वच्छता अभियानानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी प्लास्टीकमुक्तीसह ‘हरित शपथ’सुद्धा घेतली. यावेळी पंचायत समितीचे सभापती यादवराव चोपडे, गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे, सारंग खोडस्कर, पंचायत समिती सदस्य सुनील कडू, रमेश खातदेव यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच पंचायत समिती स्तरावरिल सर्व खातेप्रमुख, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही तसेच सालबर्डी ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.