अमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘मीच माझी व माझ्या कुटुंबाची रक्षक’ या ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक संगीता अरुण हातगावकर या महिलेने पटकाविला.
द्वितीय क्रमांकाच्या मानकरी संगीता अनिल ठाकरे ठरल्या. तृतीय क्रमांक तृप्ती मंगेश डहाके यांनी मिळविला. त्यांना पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते सोमवारी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तलायत महिला दिनसुद्धा साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्षा देशमुख यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी केले.
बॉक्स:
महिला पोलीस अंमलदाराचा गौरव
पोलीस खात्यात कर्तव्य बजावून मुलांनाही वेळ व त्यांना चांगले शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या महिला अंमलदार मातांचा सन्मानचिन्ह देऊन पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी गौरव केला. अर्चना संतोष बोरेकर यांची मुलगी भाग्यश्री यांची अमरावती महापालिकेत सहायक उपायुक्त पदावर निवड झाली आहे. मोहिनी चव्हाण यांची मुलगी यशश्री या बंगळूर येथे ‘मिस इंडिया इलिक्झीर ब्युटी २०२०’ घोषित झाल्या. बबीता इंगळे यांचा मुलगा प्रशिक यांची ओएनजीसीमध्ये आसम येथे नियुक्ती झाली. सरस्वती दहीकर यांची मुलगी तेजस्विनी यांनी रेसलिंग या क्रीडाप्रकारात जागतिक पातळी गाठली आहे. ममता म्हाला यांचा मुलगा अभिनव यांनी फुटबॉलमध्ये अखिल भारतीय स्तरावर द्वितीय स्थान पटकाविले.