अमरावती : स्थानिक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ (एसआरपीएफ) कॅम्प परिसरातून चंदनाची दोन झाडे कापून नेल्याची घटना २५ जुलै रोजी सकाळी उघड झाली. एसआरपीएफच्या सुरक्षा यंत्रणेला छेद देत चोरांनी चंदनाची झाडे कापून नेली. याप्रकरणी एसआरपीएफचे सशस्त्र पोलीस निरीक्षक राजेंद्र राऊत यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी कन्हैया सिरसोदे (रा. फ्रेजरपुरा) व बंडू वामनराव चाचरकर (रा. भोईपुरा, वडाळी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. क्यूआरटी पथक इंचार्जनी याबाबत पीआय राऊत यांना माहिती दिली. त्यावरून पाहणी केली असता, एसआरपीएफ कॅम्पमधील गॅस गोडाऊन ते पंचवटी परिसरातील १११ व ११५ असे क्रमांक मिळालेली चंदनाची दोन झाडे कापून नेल्याचे आढळून आले.
वडाळीमधील लाकूडतोड्या कन्हैया सिरसोदे व याच परिसरात मासेमारी करणारा बंडू चाचरकर यांनी ते कापून नेले असावे, असा संशय पोलीस निरीक्षक राऊत यांनी व्यक्त केला. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. महिनाभारापूर्वी नेमक्या याच भागातून चंदनाची झाडे चोरीला गेली होती. एसआरपीएफसारख्या पोलिसांच्या संरक्षणात असलेल्या परिसरातून चंदनाची झाडे कापून नेण्याचा महिनाभरातील हा दुसरा प्रकार होय.
२५ जून रोजी घडली होती घटना
यापूर्वी २५ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास एसआरपीएफमधील गॅस गोडाऊन परिसरातून सहा हजार रुपये किमतीची चंदनाची दोन झाडे कापून नेल्याचे आढळून आले होते. त्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र राऊत यांच्या तक्रारीवरून २९ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या घटनेच्या बरोबर महिन्यानंतर २५ जुलै रोजी पुन्हा त्याच भागातून चंदनाची दोन झाडे चोरीला गेली.
संवेदनशील ठिकाणे लक्ष्य
एसआरपीएफमध्ये यापूर्वी चंद. तस्करीचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत असताना पुन्हा चंदनाची झाडे कापून नेण्यात आली. शहरात अनेक इंग्रजकालीन इमारती व त्याअनुषंगाने परिसर असून, त्यातील चंदनाची वृक्ष तस्करांच्या रडारवर आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय अशा वेगवेगळ्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ठिकाणांना चोरटे सातत्याने लक्ष्य करीत आहेत. दुर्दैवाने या तस्करांचा कोणताही मागमूस पोलिसांना मिळालेला नाही.