दर्यापूर, भातकुली तालुक्याला लाभ : महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन समितीची मान्यतालोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील खारपाणपट्ट्यात येणाऱ्या सर्वच गावांना शापमुक्त करण्यासाठी शासनाव्दारे विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असल्या तरी आता स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापित होणार आहे. अकोला कृषी विद्यापीठाद्वारे स्थापित होणाऱ्या या संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अमरावती विभागातील शापित खारपाणपट्ट्याच्या विकासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) मान्यता दिली आहे. यामुळे ‘क्षारपड’ जमीन संशोधन केंद्रामध्ये सिंचन व पाणी या दोन प्रश्नांसह मानवी आरोग्यावर होणारा खाऱ्या पाण्याच्या परिणामांचा विचार प्रामुख्याने केला जावा, अशी अपेक्षा या पट्ट्यातील नागरिकांची आहे. चांगली व सुपीक जमीनसुध्दा खारपाणपट्ट्यामुळे निकृष्ट होत असल्याने सिंचनाचा प्रश्न बिकट बनला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील दर्यापूर व भातकुली तालुक्यामधील बहुतांश गावे खाऱ्या पाण्याच्या परिणामांच्या झळा सोसत आहेत. शहानूर प्रकल्पासह लहान-मोठ्या पेयजल योजनांमुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी सिंचनासाठी ठोस, अशी उपाययोजना तसेच पीकपद्धतीत बदलाच्या दृष्टीनेही संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधन केंद्रामुळे शेतकरी व नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यात १.६० लाख हेक्टरमध्ये खारपाणपट्टाअमरावती : अमरावती जिल्ह्यात ७.८१ लाख लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी १ लाख ८७ हजार क्षेत्रामध्ये उथळ व हलकी जमीन आहे. ५ लाख ९४ हेक्टर मध्यम ते भारी प्रकारची जमीन असून १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रात खारपाणपट्टा आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या १३ टक्के आहे. जिल्ह्यातील दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील जमीन चोपन आहे व पिण्याचे पाणीदेखील खारट आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने शेती उत्पन्नावर या पाण्याचा विपरीत परिणाम होतो. पश्चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांनी साधारणपणे ४० ते ५० किलोमीटर रुंद व १५५ किलोमीटर लांब असा अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात खारपाण पट्टा आहे. उपायांच्या अनुषंगाने संशोधनाची गरजविदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत आहे. हा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यपालांच्या निर्देशान्वये डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समतोल प्रादेशिक विकास उच्चाधिकार समितीने अडीच वर्षांपूर्वी विदर्भाचा दौरा करुन अहवाल सादर केला होता. त्यामध्ये खारपाणपट्ट्यावर विशेष भर दिला आहे. या समितीच्या शिफारसीनुसार सूचनांच्या अनुषंगाने संशोधन होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सहनशक्तीचा अंतजिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील पाणी दूषित आहे. हे पाणी पिल्याने किडनीचे आजार व कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात. परिसरात किडनी तसेच पोटाचे विकार वाढले आहेत. वर्षानुवर्षे त्याचे दुष्पपरिणाम या भागातील नागरिक सहन करीत आहेत. त्यामुळे आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याचे दिसते.
खारपाणपट्ट्याचे होणार संशोधन
By admin | Updated: August 14, 2015 00:55 IST