अमरावती : जिल्हा परिषदेने तीन दिवसापासून सुरू असलेली बदल्याची लगीनघाई आता आटोपली आहे. बदली प्रक्रियेच्या तीन दिवसांत २७६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. यामध्ये २६ जुलै रोजी ३९, २७ जुलैला १२१ आणि २८ जुलै रोजी ११६ कर्मचाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, उपमुख्य कार्यपालन अधिकारी तुकाराम टेकाळे यांच्यासह संबंधित विभागाचे खातेप्रमुखांच्या उपस्थितीत बदल्यांची कार्यवाही पूर्ण केली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे १० टक्के प्रशासकीय आणि पाच टक्के विनंती बदल्यांचे प्रमाण निश्चित करण्यात आले होते. यानुसार समुपदेशनाने बदल्या केलेल्या आहेत. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पशुसंवर्धन, सिंचन, बांधकाम, कृषी, वित्त, आणि महिला व बाल कल्याण विभागातील ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सामान्य प्रशासन आणि पंचायत विभागातील १२१ कर्मचाऱ्यांच्या, तर तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागातील ८७ आणि शिक्षण विभागातील २९ अशा एकूृण ११६ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बॉक्स
संपूर्ण बदली प्रक्रिया ऑनलाइन
बदलीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांचे मार्गदर्शनाखाली विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बदल्यांची कार्यवाही ऑनलाईन केली आहे. खातेप्रमुखांनी मुख्यालयातून, तर तालुका पातळीवर अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत त्या-त्या ठिकाणाहून सहभाग नोंदविला. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी यापूर्वी प्रकाशित करण्यात आल्या होत्या, शिवाय सूचना व हरकती मागवून त्यांची सुनावणी यापूर्वीच घेण्यात आली होती. त्यामुळे प्रक्रिया शांततेत पार पडली.