जिल्हा प्रशासन गंभीर : सुटीच्या दिवशी सुरू राहणार मेळघाटातील बँका, पोस्ट आॅफीसचिखलदरा : आदिवासींचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे होळी. त्यामुळे त्यांना वेळेत नरेगाच्या कामावरील मजुरांना पैसे उपलब्ध व्हावे, यासाठी मेळघाटातील ११ ते १३ मार्च या शासकीय सुटीच्या दिवशी अचलपूर, धारणी व चिखलदरा तालुक्यातील पोस्ट कार्यालये, बँका उघड्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहेत. जवळपास पाच कोटी रुपयांचे वेतन वाटपासाठी प्रशासनाची रात्रंदिवस धावपळ सुरू असल्याचे चित्र मेळघाटात आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी मजुरांचे वेतन किमान १२ आठवड्यांपासून देण्यात आलेले नव्हते. नऊ कोटींपेक्षा अधिकचे वेतन एकट्या चिखलदरा तालुक्यातील मजुरांचे होते. आदिवासी मजुरांची होळी अंधारात जाणार, अशा मथळ्याखाली 'लोकमत'ने गुरूवारी वृत्त प्रकाशित केले होते. यावरून जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.याची दखल घेऊन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी संबंधितांना बँका, पोस्ट आॅफीस सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आदिवासींना होळी सणापूर्वी त्यांच्या मजुरीचे वेतन देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)सुटीच्या दिवशी पोस्ट आॅफिस सुरू ठेवा मेळघाटातील आदिवासी मजुरांना त्यांच्या नरेगा अंतर्गत केलेल्या मजुरीचे वेतन देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजतानंतर सलग तीन दिवस सुटी आल्याने मेळघाटात एकच खळबळ माजली होती. परंतु, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सर्व पोस्ट, तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांना ११ ते १३ मार्च या सुटीच्या दिवसात कार्यालये सुरू ठेऊन होळी सणानिमित्त आदिवासी मजुरांना वेतन अदा करण्याचे आदेश एका पत्राद्वारे दिल्याने, आदिवासींना होळीच्या दिवसापर्यंत त्यांच्या घामाचे दाम मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पोस्टापुढे लागल्या रांगासाहित्य, परिधान विविध खरेदीसाठी आदिवासींना त्यांच्या घामाचे दाम मिळण्यासाठी गावागावातील पोस्ट कार्यालयामुळे रांगा लागत आहेत. मेळघाटातील प्रत्येक खेड्यातील हे दृष्य असून, आता १३ मार्चपर्यंत त्यांना वेतन वितरित केल्या जाणार आहे. ११ ते १३ मार्च या शासकीय सुटीच्या दिवशी काही प्रमुख कार्यालये, पोष्ट कार्यालय, ग्रामपंचायत उघडे ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, होळीसाठी आदिवासींना मग्रारोहयोचे वेतन त्यातून वाटप होणार आहे.- सैफन नदाफ, तहसीलदार, चिखलदरा
आदिवासी मजुरांचे वेतन देण्यासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 00:32 IST