निवेदन : थकीत पाच महिन्यांचे वेतन देण्याची मागणीअमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत संगणक परिचालकांचे मागील फेब्रुवारी ते जून अशा पाच महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारी संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके व मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन देऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे.जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये संग्राम अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर संगणक परिचालक कार्यरत आहेत. मात्र मागील पाच महिन्यापासून या संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतीमध्ये काम करूनही त्यांना हक्काचा मोबदला मिळाला नाही. परिणामी कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा भागवावा, असा प्रश्न कंत्राटी संगणक परिचालकांना पडला आहे. थकीत मानधनासाठी या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही याची दखल घेण्यात न आल्याने या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत धडक देत याकडे पदाधिकारी व अधिकारी यांचे लक्ष वेधले. दरम्यान, याबाबत योग्य दखल घेण्याचे आश्वासन अधिकारी व पदाधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी अलिम खान, अंकेश शेंडे, दत्ता रायजाळे, योगेश जगताप, साजीद पठाण, पवन टाले, ज्योती कांबळे, माधूरी मेश्राम, शितल ढाणके, महेश वैश्य, रिना गजभिये, मेघा पोटफोडे, शुभांगी धार्मिक, स्मिता चव्हाण, ज्योती नाखले, सचिन कुरमकार, विशाल रोकडे व अन्य संगणक परिचालकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
संगणक परिचालकांची वेतनासाठी धडक
By admin | Updated: July 8, 2015 00:29 IST