अमरावती: अहमदनगर गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड रुखसार शेखला अटक केली होती. अमरावती पोलिसांच्या पथकाने तिला गुरुवारी राजापेठ ठाण्यात आणले. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलिसांच्या तपास पथकाने जप्त केलेली कार व दोन दुचाकीसुद्धा राजापेठ ठाण्यात आणण्यात आल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेली आणखी एक कार अहमदनगर पोलिसांनी जप्त केली आहे. ती कारसुद्धा अमरावतीला आणण्यात येणार आहे.
चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंत तीन महिलांसह सात आरोपींना अटक करण्यात आली. दोन आरोपी फरार आहेत. रुखसारच्या पोलीस कोठडीतील चौकशीत या गुन्ह्यातील धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याचे तपास पथकाने सांगितले.
रुखसारपूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या सहा आरोपींची पोलीस कोठडी २८ फेब्रुवारीला संपुष्टात येईल. पीसीआर दरम्यान अपहरण प्रकरणातील आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे राजापेठ पोलिसांच्या हाती लागले आहेत. अपहरणासाठी गुंड पुरविणारा अहमदनगर येथील सराईत गुन्हेगार टकल्या हा फरार आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे, हे पुढे येणार असल्याचे तपास पथकाने स्पष्ट केले.