लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा सुधारित करण्यात आले असून, आता कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपिड अँटिजेन अँटिबॉडीज तपासणीचे दरदेखील कमी करण्यात आले असून, अँटिजेन टेस्ट १५० रुपये करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेने याहून अधिक दर आकारल्यास साथरोग प्रतिबंध कायदा व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा सुधारित करण्यात आले. त्यामुळे ४५०० रुपयांवरून दर कमी करीत करीत आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे १२००, ९८० आणि ७०० रुपये असे दर केले होते. संकलन केंद्रावरून नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५०० रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये, तर रुग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.आरटी-पीसीआर चाचणीसोबतच रॅपिड अँटिजेन, अँटिबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत.
अँटिबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी अनुक्रमे ३५०, ४५०, ५५० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.
रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १५०, २०० व ३०० रुपये असे दर आता निश्चित करण्यात आले.
निर्गमित शासननिर्णयानुसार कोरोना चाचण्यांसाठी ५००, ६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.