काळ्या फिती लावून केला सरकारच्या धोरणांचा निषेध
अमरावती : खासगीकरणाला विरोधासाठी बुधवारी आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. काळ्या फिती लावत शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध केला. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला. या कायद्यातील तरतुदीनुसार नवीन वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत होणार आहे. याचाच अर्थ, जे काम आरटीओ कार्यालयामार्फत केले जाते, ते काम खाजगी यंत्रणेमार्फत केले जाईल. त्यामुळे या कामास नेमलेल्या कर्मचाऱ्यांची भविष्यात आरटीओ विभागातील गरज भासणार नाही. अशाप्रकारे या विभागात खासगीकरणाचा प्रयत्न सुरू झाला आहे. ही बाब आरटीओ विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. भविष्यात हा विभाग खाजगी व्यक्तीच्या खिशात घालण्याचा डाव सरकारने चालवला आहे. हा डाव उधळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन केले.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अनिल मानकर, संदीप खवले, अमोल गंगाखेडकर, उज्ज्वल ठाकरे, विजय गावंडे, मनोज खोब्रागडे, आशिष माथूरकर, पराग जाधव, प्रमोद राजनेकर, राजेश राठोड, देवेंद्र कळमकर, मंगेश देशमुख, राजेश राऊत, संकल्पा डोळके, रोहिणी दातार, अक्षय राठोड,अमोल मेश्राम राजेश पाटील, संजय चौधरी, आशिष प्रधान, संजय देशमुख, श्याम बढे आदी सहभागी झाले होते.