अकोला: जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उशिरा समोर आली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी १0 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये अमरावतीच्या बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व शाखा व्यवस्थापकाचा समावेश आहे. गांधी रोडवर राहणारे अभिजित शरदचंद्र मुळे (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २00९ मध्ये त्यांनी शिवणी परिसरातील जमिनीच्या खरेदीचा व्यवहार धम्मरक्षा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष विश्वास भाऊराव रायबोले (रा. मलकापूर) यांच्यासोबत केला. त्यासाठी त्यांना ५३ लाख ५0 हजार रुपयांचा धनादेशसुद्धा दिला; परंतु धनादेश अनादरित झाल्याने संस्थेने मुळे यांना त्यांच्या जमिनीचे कागदपत्र व जमीन परत केली. दरम्यान, विश्वास रायबोले यांनी तुलसीदास शोभराजमल लुल्ला, रामपुरी चौक अमरावती, मिलिंद गोविंदराव लोहकरे, नितीन भगवंतराव बुरंगे, गणेश महादेव इंगोले, दिलीप पुंडलिक उपरकर, उल्हास केशव जोशी, आलोक जोशी, दिलीप पाठक, शाखा व्यवस्थापक ऑफ इंडिया गाडगेनगर अमरावती, प्रसाद जोशी, क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्यासोबत संगनमत करून मुळे यांच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून ही जमीन अमरावती येथील तुलसीदास लुल्ला यांना विकली. त्यानंतर रायबोले व लुल्ला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेतून ८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मुळे यांना ही बाब माहिती पडल्यानंतर २६ ऑगस्ट १३ रोजी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल केल्यानंतर सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
बॅँकेची ८ कोटी रुपयांनी फसवणूक
By admin | Updated: July 13, 2014 00:59 IST