६३,५९१ मजुरांच्या हाताला काम, मजूर उपस्थित मेळघाट आघाडीवर
अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू झाल्याने नोंदणीकृत मजुरांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी ५९३ ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेची २०४२ कामे सुरू आहेत. सध्या कामावर ६३ हजार ५९१ मजुरांची उपस्थिती आहे.
प्रत्येक नोंदणीकृत मजुराला शंभर दिवसांचा रोजगार देण्याची रोजगार हमी योजनेच्या कायद्यात तरतूद आहे. या कायद्याची व सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत नियोजन केले जाते. जिल्ह्यात सध्या शेतीची फार कामे नाहीत, शिवाय जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग व फॅक्टरी नसल्याने बेरोजगारांची संख्या मोठी आहे. कोरोनाकाळात अनेक मजूर बेरोजगार झाले. अशा काळात रोजगार हमी योजनेच्या कामांनी मजुरांना दिलासा मिळाला. सध्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे १४ तालुक्यांतील विविध गावांत सुरू आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला शासनाच्यावतीने दरवर्षी कामाचे उद्दिष्ट दिले जाते.
सन २०२०-२१ या वर्षात जिल्हा रोहयोच्या कामांची उद्दिष्टपूर्ती करीत सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची अनेक कामे उपलब्ध आहेत. मागेल त्याला काम देण्याची रोजगार हमी योजना विभागाची तयारी आहे. त्यानुसार विद्यमान यंत्रणा व ग्रामपंचायती मिळून ३ हजार ४०० कामे सुरू आहेत. यावर ५७ हजार ८०० एकूण मजूर काम करीत आहेत, तर केवळ ८४० पैकी ५९३ ग्रामपंचायतींमध्ये २०४२ कामांवर सुमारे ६३ हजार ५९१ मजूर काम करीत आहेत. हा आकडा येत्या काही दिवसांत अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोट
कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले. परिणामी अशा काळात मजूर वर्गाला रोजगार हमी योजनेच्या कामांमुळे दिलासा मिळाला आहे. रोहयोच्या कामांमुळे रोजगारासाठी आधार मिळाला आहे.
सविता हरिचंद्र बेलसरे, मजूर
कोट
रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम मिळते. सध्या पुरेशी कामे उपलब्ध आहेत. मागील काही महिन्यांपासून रोहयोच्या कामांचा मोबदला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता, मोबदला नियमित आणि वेळेवर मिळावा.
- मंगल तुमला कासदेकर, मजूर
बॉक्स
जॉब कार्डधारक संख्या
३५५२८२
सध्या सुरू असलेली कामे
२०४२
मजूर उपस्थिती
६३५९१
बॉक्स
तालुका ग्रामपंचायत कामे
अचलपूर ३६ ९२
अमरावती ३२ ९७
अंजनगाव सुर्जी ४८ १४३
भातकुली ३६ १९४
चांदूूर रेल्वे ३२ १००
चांदूर बाजार ५७ १७४
चिखलदरा ५० २८८
दर्यापूर ६७ १८२
धामणगाव रेल्वे २५ ५६
धारणी ५५ १९३
मोर्शी ४२ ११५
नांदगाव खं. २७ ८२
तिवसा ३७ ९१
वरूड ४९ २२५
एकूण ५९३ २०४२
बाॅक्स
सर्वांत कमी रोजगार धामणगाव तालुक्यात
राेजगार हमी योजनेंतर्गत १४ तालुक्यांत रोहयोची कामे सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक मजूर मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात २८८ कामांवर ३२ हजार ९७६ मजूर काम करीत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात २५ ग्रामपंचायतींमधील ५६ कामांवर केवळ २३० मजूर काम करीत आहेत.
बॉक्स
होळी सण तोंडावर, मोबदला मिळेना
रोजगार हमी योजनेंतर्गत मेळघाटात सर्वाधिक कामे सुरू आहेत. या कामांवर मजूर उपस्थितीही बरीच आहे. मात्र, काम करणाऱ्या मजुरांना गत महिनाभरापासून राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारा निधी अद्याप उपलब्ध झाला नाही. परिणामी मजूर वर्गाचा मोबदलाही मिळाला नाही. अशातच होळी सण तोंडावर आल्याने रखडलेला मोबदला त्वरित देण्याची मागणी मजुरांकडून होत आहे.