चौक बनले अपघाताचे केंद्र : प्रशासनाचे नियंत्रण नाहीवरूड : विश्रामगृहापासून तर इंदिरा चौकापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि पोलीस प्रशासनाचे वाहतुकीवर दुर्लक्ष असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे अनेक अपघात या मार्गावर घडत आहेत. अनियंत्रित वाहतुकीमुळे पादचाऱ्यांनासुध्दा तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनियंत्रित वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.शहरातील शासकीय विश्रामगृह, बसस्थानक परिसर, आरटीओ तपासणी नाका, पांढुर्णा चौक, जायन्टस चौक, इंदिरा चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. आरटीओ तपासणी नाक्यासमोर पांढुर्णा आणि अमरावतीकडून येणारी जड वाहने येतात. राज्य महामार्गावरून गतिमर्यादित न ठेवता भरधाव वाहने ेजात असल्याने अनेक दुचाकीचे अपघात याच चौकात झाल्याने अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गतिरोधकाची मागणी करूनही गतिरोधक लावण्यात आले नाही. राज्य महामार्गावर महात्मा फुले महाविद्यालय, महिला महाविद्यालय, न्यू.आॅरेंजसिटी कॉन्व्हेंट, न्यू, इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल, आयएमएस महाविद्यालय, एन.टी.आर. हायस्कूल, एवढेच नव्हे, तर अनेक शिकवणी वर्ग याच मार्गावर होत आहेत.दरदिवसाला १० ते १२ हजार विद्यार्थ्यांची वर्दळ असते. परंतु वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. आरटीओ चौक परिसर आणि पांढुर्णा चौक, जायन्ट्स चौक अपघाताचे स्थळ बनले आहे. महिन्याकाठी १० ते १५ अपघात येथे घडतात. काहींची नोंद पोलीस ठाण्यात होते, तर काही आपसी तडजोड करून निघून जातात. या चौकात गतिरोधक लावण्याकरिता पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली. परंतु अद्यापही तो दिवस उजाडला नाही. जिल्हास्तरीय समिती याबाबत निर्णय घेत नसल्याने गतिरोधकाचा प्रश्न रखडला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरूड येथे वाहतुकीची कोंडी
By admin | Updated: November 16, 2015 00:18 IST