अमरावती : अचलपूर तालुक्यांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येसुर्णा येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेचा तसेच कोरोना लसीकरण केंद्राची पाहणी केली. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य संदर्भातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.
आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली व स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्यात. त्यानंतर सीईओंनी देवमाळी येथील कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. अचलपूर तालुक्यात काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाची सीईओंनी पाहणी केली.यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांसोबतही संवाद साधला.याप्रसंगी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, फिजिकल्स डिस्टन्सिंग पाळावे, नियमित हात धुवावेत, असे आवाहन सीईओ पंडा यांनी केले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, सहायक गटविकास अधिकारी सतीश खानंदे, विस्तार अधिकारी महादेव कास्देकर, पांडे, ग्रामसेविका पठाण, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.