आयुक्तांची उपस्थिती : सौंदर्यीकरणाच्या सूचनाअमरावती : आ. रवी राणा यांनी रविवारी स्थानिक छत्री तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याच्या काळात छत्री तलावाचे सौंदर्य जोपासण्यासाठी काय करता येईल, यासाठी आयुक्तांशी सांगोपांग चर्चा करण्यात आली. शहर अभियंता जीवन सदार यांनी यावेळी आयुक्त आणि आ. राणा यांच्यासमोर नकाशातील काही बाबी स्पष्ट केल्या. काही दिवसांपासून छत्री तलाव परिसरात माती टाकली जात आहे. तो प्रकारही राणा आणि आयुक्तांनी जाणून घेतला. छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. या तलावाच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. राणा यांनी यावेळी दिली. छत्री तलाव परिसरात वृक्षारोपणाचा आढावाही घेण्यात आला. परिसरात पर्यटकांना कुठल्या सुविधा देण्यात याव्यात यावरही चर्चा करण्यात आली. आ. राणा यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समयोचित सूचना केल्यात. छत्री तलावाकरिता मंजूर झालेल्या २५ कोटींपैकी आठ कोटी रुपये छत्री तलावाच्या पर्यटन विकासाकरिता मिळाले आहे. यात यु.के. ट्रेन आणि नाना-नानी पार्क होणार आहे. याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपायुक्त विनायक औघड, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, शहर अभियंता जीवन सदार, नगरसेवक सुनील काळे, जयश्री मोरय्या, विजय नागपुरे, अजय मोरय्या, उमेश ढोणे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रवी राणांकडून छत्री तलाव सौंदर्यीकरणाचा आढावा
By admin | Updated: June 20, 2016 00:10 IST