आयुक्त आक्रमक : मतमोजणीनंतर होईल उहापोहअमरावती : बदलीच्या ठिकाणी रूजू न होता प्रशासनाला ठेंगा दाखविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित विभागप्रमुखांनी कार्यमुक्त केल्यानंतरही काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजु झाले नसल्याची माहिती आयुक्तांकडे पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारीला मतमोजणी आटोपल्यावर सोमवारी याबाबत सर्वांगीण आढावा घेण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. भ्रष्टसाखळी तोडण्यासाठी हे हत्यार उगारले असून, वर्षभरात किती कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यात, त्यापैकी किती कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी रुजू झालेत, याबाबतची संपूर्ण माहिती सामान्य प्रशासन विभागाला मागितली जाणार आहे. अर्थात यापूर्वीही प्रशासनाला अव्हेरणाऱ्या कर्मचाऱ्यांची कुंडली आयुक्तांसमोर मांडली जाणार आहे. बदलीच्या ठिकाणी संबंधित कर्मचारी रूजू झाला नाही तर त्याचे कारण काय, हे आयुक्त जाणून घेणार असून, ‘जुन्या जाणत्यां’वर पुन्हा एकदा बदलीची कारवाई केली जाणार आहे. ‘चिपकू’ कर्मचाऱ्यांची कुंडली उघडणारअमरावती : बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी न जाणाऱ्या किंवा त्या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करणाऱ्या टाळाटाळ करणाऱ्या विभागप्रमुखांनाही विचारणा केली जाणार असून, प्रशासनाची अवमानना आणि पेंडन्सी खपवून घेतली जाणार नाही, अशी सक्त ताकिद या आढाव्याच्या निमित्ताने दिली जाणार आहे. ९ फेब्रुवारीला काढलेल्या बदली आदेशाची अद्यापपर्यंत न झालेली अंमलबजावणी आयुक्त हेमंत पवार यांनी अतिशय गांभीर्याने घेतली असून ‘चिपकू’ कर्मचाऱ्यांची एकंदर कुंडलीच मतमोजणीनंतर उघड करण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारीची मतमोजणी, त्यानंतर आलेल्या सलग सुट्या पाहता सोमवारनंतर हा आढावा घेतला जाण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. डझनवारी कर्मचाऱ्यांकडून पायमल्ली९ फेब्रुवारीला काढलेल्या बदली आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांना त्वरित कार्यमुक्ततेचे आदेश मिळाले असले तरी यापूर्वी अशीच पायमल्ली करणाऱ्यांची महापालिकेत कमतरता नाही. त्यांची संपूर्ण माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून काढली जाणार आहे. निवडणुकीच्या कामाचा बागुलबुवा करीत जुन्याच ठिकाणच्या अर्थपूर्ण फाईली हाताळणाऱ्यांचा ‘रिव्ह्यू’ घेतला जाणार आहे.
प्रशासनाला आव्हान देणाऱ्यांचा ‘रिव्ह्यू’
By admin | Updated: February 23, 2017 00:08 IST