रेती चोरीवर नियंत्रण : पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानधारणी : गौणखनिज तस्करांवर रात्रंदिवस महसूल विभागाच्या गस्तीने नियंत्रण लावले गेले असल्याने चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील एकमात्र तापी घाटाचे रेती लिलाव करण्यात आले आहे. त्यामुळे इतरत्र रेती घाटांवर मध्यंतरीच्या काळात रेती तस्करांचे साम्राज्य निर्माण झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने सतत सचित्र वृत्त प्रकाशित करीत महसूल प्रशासनाला जागे केले. याची दखल थेट जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेत उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले. एसडीओ षणमुगराजन एस. यांनी या सर्व गैरप्रकारावर मॉनिटरिंग करीत तहसीलदारांना अलर्ट केले. तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वत: जीप गाडीवर गस्तीला प्रारंभ केला व असेच करण्याचे निर्देश तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिले. गेल्या आठवडाभर अधिकारी रेती चोरट्यांचा मागावर होते. तहसूल विभागाचे अधिकारी रेती घाटांवर धाड टाकत असल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले. परिणामी गौण खनिजावरील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)संपूर्ण यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नाने गौणखनिज तस्करीवर नियंत्रण ठेवण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. गावपातळीवर तलाठी व पोलीस पाटील यांचीही तत्परता यात उल्लेखनीय ठरत आहे. - षणमुगराजन एस, एसडीओ, धारणी.
महसूल विभागाने आवळला गौणखनिज तस्करांवर फास
By admin | Updated: March 20, 2016 00:24 IST