जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितपथ्रोट : शहानूर प्रकल्पाकरिता काळ्या मातीसाठी संपादित केलेली जमिनी परत मिळण्याकरिता माजी जि. प. सदस्य अशोक पटोकार यांच्या नेतृत्वाखाली शहानूर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना निवेदन दिले.पथ्रोट, जहानपूर, मलकापूर, रायपूर व वागडोह येथील जमिनी या सन १९८१ ते १९९० च्या दरम्यान शहानूर प्रकल्पाच्या कामाकरिता खासगी वाटाघाटीने काळ्या मातीकरिता संपादित करण्यात आल्या होत्या. सदर जमिनी प्रकल्पाकडून संपादित करताना काळी माती काढून नेल्यानंतर मूळ मालकांना परत देण्यात येईल, असे सांगून शेतकऱ्यांकडून खासगी वाटाघाटीने घेण्यात आल्यात. परंतु शेतकऱ्यांनी जमिनी संपादित केल्यानंतर शहानूर प्रकल्पाने सातबारावर त्यांचे नावे लावून घेतली. जमिनीकरिता आम्हा सर्व शेतकऱ्यांना त्यावेळेस प्रती एकर रुपये ३००० ते ५००० फारच कमी मोबदला देण्यात आला. किंबहुना खासगी वाटाघाटीनुसार शेतातील मातीचीच किंमत आम्हाला देण्यात आली. या प्रकल्पात अनेक शेतकरी भूमिहीन झालेत. त्यांचे पुनर्वसनही शासनाकडून करण्यात आलेले नाही. शहानूर प्रकल्पात काळ्या मातीकरिता संपादित केलेल्या जमिनी आजही आमच्याच ताब्यात आहेत. या जमिनीवर पीक घेण्याकरिता आम्हाला शहानूर प्रकल्पाकडून सिंचनाकरिता पाणीसुद्धा देण्यात येते. आयुक्तांच्या पत्रानुसार, जमिनी परत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण मागील १४ वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. शहानूर प्रकल्पात संपादित केलेल्या काही जमिनी पर्यटन, वनीकरण, कालव्याकरिता राखीव ठेवल्या आहेत, तर काही जमिनी परत करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये आमच्या काही जमिनी परत करण्यायोग्य क्षेत्रामध्ये येते. त्यामुळे शासनाने या जमिनी आम्हास परत केल्यास आम्हा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन केल्यासारखेच होईल. (वार्ताहर)
शहानूर प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परत द्या
By admin | Updated: March 20, 2016 00:23 IST