अमरावती : केंद्र शासनाच्या टपाल विभागातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षेसाठी विदर्भात नागपूर येथे एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले होते. उमेदवारांनी परीक्षेसाठी जाताना एसटी व रेल्वे गाड्यांत एकच गर्दी केली असताना सायंकाळी ४ वाजता पेपर संपताच परतीच्या प्रवासाला निघालेल्या काही उमेदवारांना वाहन मिळाले नाही. बसस्थानक, रेल्वेस्थानकावर मुक्काम ठोकून सोमवारी सकाळी परतीचा प्रवास त्यांना करावा लागला.
केंद्रीय
टपाल विभागामार्फत पोस्टल सहायक, शॉर्टिंंग सहायक, पोस्टल सहायक (बचत बँक) अशा विविध सुमारे एक हजार पदांकरिता राज्यात एकाच वेळी रविवार ११ मे रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत राज्यातील पाच परीक्षा केंद्रांवर लाखो उमेदवारांनी या पदासाठी परीक्षा दिली. टपाल विभागाने जाहीर केलेल्या राज्यातील पाच परीक्षा केंद्रांपैकी विदर्भात एकमात्र परीक्षा केंद्र नागपुरात देण्यात आले होते. त्यामुळे सोयीचे परीक्षा केंद्र म्हणून अनेक उमेदवारांनी नागपूर येथील केंद्राला पसंती दिली होती. तसा उल्लेखही अर्ज सादर करताना नोंदविला. रविवार सुटीचा दिवस अन् त्यातही टपाल विभागाचा पेपर दुपारी २ ते ४ यावेळेत असल्याने अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी सकाळी पाच वाजतापासून परीक्षेला जाण्यास सुरुवात केली. त्यासाठी नियोजनही केले; मात्र अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी होती. याशिवाय रेल्वेस्थानकावर हीच परिस्थिती होती. त्यामुळे कधी नव्हे एवढी उमेदवारांची प्रवासासाठीची गर्दी एसटी महामंडळाला वाहतूक करण्यासाठी दमछाक करणारी ठरली. महामंडळाने
जादा बसेस सोडल्यानंतरही मिळेल त्या वाहतूक सुविधेने प्रवास करण्याची इच्छा मनात असतानाही वाहतूक सुविधा तोकडी पडल्याचे चित्र आहे. मात्र कशाही पद्धतीने उमेदवारांनी परीक्षा केंद्र गाठून परीक्षेत सहभाग नोंदविला. हीच गर्दी परतीच्या प्रवासात पहावयास मिळाली असताना टपाल विभागाची परीक्षा देऊन घराची आस धरणार्या अनेक उमेदवारांना रात्री उशिरापर्यंंत परतीचा प्रवास करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करूनही वाहतूक सुविधा अपुरी पडत असल्याने बसस्थानक, रेल्वेस्थानक, नातेवाईक यांचेकडे मुक्काम ठोकून मंगळवारी नाईलाजास्तव परतीचा प्रवास करावा लागला. (प्रतिनिधी)