गजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यातील घाऊक केरोसीन परवानाधारकांनी किरोकळ केरोसीन विक्रेत्यांना द्वारपोच वितरण मागील ५ वर्षांपासून केलेले नाही. मात्र या अंतरासाठी प्रती किलोमीटर २ रुपये ५४ पैसे प्रमाणे ६७ कि.मी. अतिरिक्त दराचा लाभ उचलला व शासनाची फसवणूक केली. यासाठी पुरवठा उपायुक्त यांनी जिल्ह्यातील २१ घाऊक विक्रेत्यांकडून २ कोटी ४३ लाख ९९ हजार ३९२ रुपयांची वसुली करण्याचे आदेश बजावले आहे. स्वत:च्या खर्चाने केरोसीनची उचल किरकोळ विक्रेत्यांनी केली असल्याने वसुलीची रक्कम किरकोळ विक्रेत्यांना मिळण्याची शक्यता आहे. तशी मागणीदेखील जिल्हा संघटनेनी केली. शासनाने वेळोवेळी केरोसीनचे दरात सुधारणा केलीे. दर निश्चित करताना द्वारपोच वितरण करण्यासाठी ६७ कि.मी. अंतरासाठी भाड्याचे अतिरिक्त दर घाऊक विक्रेत्यांसाठी मंजूर केले. मात्र जिल्ह्यातील घाऊक केरोसीन परवानाधारकांनी किरकोळ केरोसीन विक्रेत्यांना द्वारपोच वितरण न करताही भाड्यापोटी शासनाकडून २ कोटी ४३ लाखांवर रकमेची उचल शासनाकडून केली. विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराज चिमाजी यांनी घाऊक केरोसीन विक्रेत्यांकडून रक्कम वसुल करण्याचे आदेश १७ आॅक्टोबरला दिले आहे. घाऊक केरोसीन परवानाधारकांकडून ही रक्कम वसुली करण्यात येणार आहे. अमरावती जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघाद्वारा ही बाब शासनाने वेळोवेळी निदर्शनात आणून दिली. मात्र जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व केरोसीन कंपनीचे एजंट यांच्यात साटेलोटे असल्याने आजवर या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे यांनी केला आहे. तालुक्याच्या ठिकाणांवरुन केरोसीनची उचल करताना वाहतुकीचा खर्च सहन केल्यामुळे वसुलीची रक्कम अंतराचे हिशेबाप्रमाणे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
किरकोळ केरोसीन विक्रेत्यांना मिळणार वसुलीची रक्कम?
By admin | Updated: November 1, 2014 01:30 IST