अमरावती : कोरड्या दुष्काळामुळे लग्नसराईवरदेखील परिणाम झाला असून मंगल कार्यालयांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पार कोलमडून गेले आहेत. लग्न जमले, तारखा काढल्या, पण आर्थिक संकटात सापडल्याने लग्नाचा खर्च करावा तरी कसा, असा मोठा प्रश्न वधू-वर पित्यासमोर उभा आहे. काही पालकांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह काही महिने पुढे ढकलल्याचे वास्तव समोर आले आहे. लग्नाच्या तिथींवर अवलंबून असलेली मंगल कार्यालये, आचारी, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, फुले, वाहन आदी व्यवसायांनाही दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे.तुळशीचे लग्न झाले की लग्नसराईची धूम सुरु होते. मिळेल ते मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन, बँड, ढोल ताशाच्या फुलापासून ते आचाऱ्यापर्यंत बुकिंगसाठी वधू-वर पित्यांची घाई असते. यंदा मात्र जमलेले शुभमंगल उरकावे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी वधु-पित्यांना पडला आहे. अनेक खेड्यात जमलेले विवाह दुष्काळाच्या परिस्थितीमुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे. काटकसरीने विवाहाचे नियोजनयाच वर्षी लग्न आवश्यक असणाऱ्यांनी काटकसर करुन नियोजनही सुरू केले आहे. ग्रामीण भागातील लग्नाच्या अनेक तारखांचे तक्ते रिकामेच आहेत. आचाऱ्यांच्या हाताला काम नाही. यावर आधारित अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांवर दुष्काळाचे सावट पडले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे रबीसाठी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी रब्बीची पेरणी केली. रबीच्या पिकांवर मुला-मुलींचे विवाह करण्याच्या हेतूने काही पालकांनी मे महिन्याचे मुहूर्त धरले आहेत.
लग्नसराईवर परिणाम मंगल कार्यालये ओस
By admin | Updated: January 3, 2015 00:19 IST