जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना प्रसूती संदर्भात आरोग्य सेवा पुरविणार्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पाच महिलांच्या प्रसूतीची जबाबदारी एकाच परिचारिकेवर आहे. त्यामुळे येथील परिचारिकांसह कर्मचार्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. डफरीनमध्ये केवळ ५६ परिचारिका कार्यरत असल्याने प्रसूत महिलांना देण्यात येणारी आरोग्य सेवा खोळंबली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयात जिल्हाभरातून अनेक महिला प्रसूतीकरिता येतात. मात्र, महिला रूग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड वारंवार होत असते. परंतु रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्याने अपुर्या मनुष्यबळाअभावी रूग्णांना सेवा देण्यात रूग्णालय प्रशासन कमी पडत आहे. उन्हाळ्यात प्रसूतीकरिता येणार्या महिलांचा ओघ रूग्णालयात वाढला आहे. रुग्णालयातील ६ वॉर्डांमध्ये ३५0 हून अधिक महिला उपचारासाठी दाखल आहेत. सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) पाच रुग्णांमागे एकच परिचारिका असल्याचे दिसते. नियमानुसार एका रुग्णाकरिता तीन परिचारिकांची आवश्यकता असते. परिचारिकांच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे चित्र आहे. तरीदेखील तोकड्या मनुष्यबळावर जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कारभार सुरु आहे. मनुष्यबळ वाढविण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून शासनाला कळविण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतेही दिशानिर्देश मिळालेले नाहीत. रुग्णांची वाढती संख्या पाहता नवीन वॉर्डांची निर्मिती करण्याची गरज आहे.