अमरावती : शुक्रवारी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमिवर फ्रेजरपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी चिमण्यांना वाचविण्याचा संकल्प घेतला. चिमण्याप्रती आवड, चिमण्यांना जगविण्याची प्रेरणा इतरांना मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून मोहक, आकर्षक शंभर चिमण्याच्या आकाराची निर्मिती केली. आधुनिक थ्री-डी (त्रिमित) पद्धतीचा यात सरख वापर करण्यात आला. निरूपयोगी वस्तूपासून चिमण्याच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी आठवडाभर परिश्रम घेतले. चिमण्याचा आकार साकार करताना शिक्षक आशीष देशमुख व महेश अलोणे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. चिमण्याचा आकाराची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी चिमण्यांना वाचविण्याच्या मोहीमेस पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली. चिमण्याच्या जगण्याने पर्यावरणाचा ऱ्हास थांबविला जाऊ शकतो, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. गुरुवारी या चिमण्याचे प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले होते. प्रदर्शनीदरम्यान विद्यार्थ्यांनी पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा यासारख्या घोषणा देखील दिल्यात. उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव बाळासाहेब अढाऊ यांनी केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाड लावण्यासोबतच पाण्याचा काटकसरीने वापर करावे. झाडाच्या वाढीने चिमण्या जीवंत राहण्यास मदत होऊन पुन्हा चिवचिवाट होईल असे अढाऊ यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी पक्षीमित्र अनंत वडतकर उपस्थित होते. चिमण्यांना वाचविण्याच्या या मोहिमेत भूषण हटवार यांच्या मार्गदर्शनात शिरिष दराणी, नीलेश देशमुख, कान्हेरकर, जामदार, राठोड, वीरेंद्र शिरभाते, सोनाली वगार, रेखा तायडे, शिल्पा खाडे, अंजली सांगोले आदी शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी केला चिमण्या वाचविण्याचा संकल्प
By admin | Updated: March 20, 2015 00:24 IST