खोदकाम प्रकरण : एअरटेलला दीड कोटी भरावे लागणारअमरावती : रिलायन्स कंपनीने शहरात ४ जी सेवा पुरविण्यासाठी भुयारी केबल टाकण्याचे काम सुरु केले आहे. त्याकरिता रस्ते खोदकाम केले जात असून ते नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवून महापालिकेने रिलायन्सला साडेसात कोटी रुपये दंड आरकाण्याची नोटीस बजावली आहे. तसेच एअरटेल कंपनीने विनापरवानगीने भुयारी खोदकाम केल्याप्रकरणी दिड कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.रिलायन्स कंपनीला केबल टाकण्याच्या भुयारी खोदकाम करण्यासाठी सन २०१३ पर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र रिलायन्स कंपनीमार्फत २०१५ वर्ष संपत असताना भुयारी केबल टाकण्याचे काम निरंतर सुरू आहे. परिणामी परवानगी संपल्यानंतरही भुयारी केबल टाकण्याचे काम सुरु असल्याप्रकरणी रिलायन्सला साडेसात कोटी रुपये दंड भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान रिलायन्स कंपनीने नोटीसला उत्तर पाठविले. परवानगी काढताना त्यावेळेस महापालिकेत अटी, शर्थीनुसार पैसे भरल्याचा दावा रिलायन्सने केला. परंतु भुयारी केबल खोदकाम करण्याचा कालावधी हा २०१३ पर्यंत ही बाब प्रशासनाने पुढे केली. आता सुरु असलेले भुयारी खोदकाम नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवून साडेसात कोटी रुपये दंडाची रक्कम भरण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक रुख्मिणीनगर मार्गावर एअरटेल कंपनीने टॉवरशी केबल जोडण्यासाठी रस्ते खोदकाम केल्याप्रकरणी या कंपनीला दीड कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
रिलायन्सला साडेसात कोटी दंडाची नोटीस
By admin | Updated: December 19, 2015 00:08 IST